औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. या वेळेत मतदान केंद्रांवर मतदारांना सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेसाठी पूर्वी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान घेण्यात येत होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगाने वेळ बदलली आहे. उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का घसरतो. त्यामुळे सकाळी अर्धा तास आणि सायंकाळच्या टप्प्यात एक तास वाढविण्यात आला आहे. प्रशासन तांत्रिक कारणे सांगत असले तरी उन्हामुळे मतदान कमी होऊ नये, यासाठीच आयोगाने वेळ वाढविल्याचे स्पष्ट होते.
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी शेडस् करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमोपचारासह चार मतदान केंद्रांसाठी एक आरोग्य पथक तैनात असेल. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास मतदान केंद्रे आहेत. १२२ ठिकाणच्या इमारती जीर्ण असल्यामुळे त्यांची कामे सुरू असल्याने ती इतरत्र स्थलांतरित केल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रींगी यांनी सांगितले.