खुलताबाद (औरंगाबाद ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात सोमवारी जय बाबाजी भक्त परिवाराची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. महामंडलेश्वर प.पू. शांतीगिरी महाराज सांगतील तेच आमचे धोरण राहील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘राजकारणाचे शुद्धीकरण’ ही मोहीम शांतीगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविली जात आहे. या जनजागृती चळवळीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
औरंगाबाद, जळगाव, नाशिक, शिर्डी, अहमदनगर, धुळे, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे, याबाबत शांतीगिरी महाराज सांगतील तेच तत्त्व आणि तेच धोरण जय बाबाजी भक्त परिवाराचे राहणार आहे. दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी स्वत: लोकसभा निवडणूक लढवावी, असे साकडेही यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना घातले. या बैठकीनंतर घृष्णेश्वर महादेवाला अभिषेक करण्यात आला. या बैठकीमुळे महाराजांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.