औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत खिरापतीप्रमाणे पदे वाटली जाऊ लागली आहेत. जे पदाधिकारी (महिला आघाडीसह) राजीनामा देऊन पक्ष सोडून गेले होते. त्यांना देखील मोठ्या पदांचे गिफ्ट देऊन खुश करण्यात आल्यामुळे निष्ठावान पदाधिकाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
सहा विधानसभा मतदारसंघांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असताना चार सहसंपर्कप्रमुख नियुक्त करण्याची किमया शिवसेना नेत्यांनी साधली आहे. सुहास दाशरथे, अण्णासाहेब माने, आ. संदीपान भुमरे यांच्याकडे सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना सहसंपर्कप्रमुख करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आ. भुमरे वगळता उर्वरित तिन्ही सहसंपर्कप्रमुख औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत. राजीनामा देणाऱ्यांना पुन्हा पक्षप्रवेश देण्यापूर्वी वरिष्ठ पातळीवर परवानगी घेणे गरजेचे आहे; परंतु सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वरिष्ठांच्या परवानगीला बगल देण्यात येत आहे.
१७ उपजिल्हाप्रमुखांचे संघटननाराजांना उपजिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीचे पत्र देऊन खुश करण्यात येत असल्याची माहिती सेनेच्या गोटातून मिळाली आहे. ९ तालुक्यांच्या जिल्ह्यात १७ उपजिल्हाप्रमुख नेमण्याचा प्रकार सुरू झाला आहे. जे विद्यमान उपजिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्याकडेच कुठलीही संघटनेची जबाबदारी नाही, त्यातच आणखी नवीन पदधारकांची भर पडणार असल्यामुळे विद्यमान उपजिल्हाप्रमुख नाराज झाले आहेत. ३ उपजिल्हाप्रमुखांवर जबाबदारी असलेला हा जिल्हा १७ पदाधिकारी नेमण्याइतका मोठा झाला आहे. विनायक पांडे, आनंद तांदूळवाडीकर यांना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पांडे आणि सेना नेत्यांमध्ये मागील काही वर्षांपासून वाद आहेत, त्यातून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी केली होती; परंतु त्यांना पुन्हा जवळ करण्यामागे फक्त निवडणूक हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.