औरंगाबाद : संदेश पाठविण्यासाठी मोबाईल, मेल, व्हॉटस्अॅपसारखी अत्याधुनिक साधने आल्यापासून संदेशवहनाचे काम करणारे डाक विभागाचे ‘पत्र’ गायब झाले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव जि. प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मामा’ला हे पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांनी मामाला लिहिलेल्या पत्रामध्ये ‘आधी मतदान केंद्रावर, मग जाऊ शेतावर’, ‘पिक्चर नही, सैर नही, शादी करेंगे बादमे! पाच साल का चुनाव है भाई मतदान करेंगे साथ में’ असे संदेश लिहिलेले आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मामाला पत्र पाठविण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत पुन्हा एकदा डाक विभागाच्या पत्राला उजाळा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख दिनकर बोडखे, मुख्याध्यापक सुरेश मोरे, कैलास गायकवाड यांनी कौतुक केले आहे. या उपक्रमासाठी सुभाष बडक, मेवालाल भौये, प्रज्ञा डोंगरदिवे, छाया महाजन यांनी सहकार्य केले.