औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघाचा विचार केल्यास यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने नवमतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींबद्दल असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून रोजगार, महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान, असे प्रश्न प्रामुख्याने समोर आले.
महिलांची सुरक्षा महत्त्वाची आज औरंगाबाद शहरात महिला सुरक्षित आहेत; पण या सुरक्षिततेत अजून वाढ होण्याची गरज आहे. बलात्कार, छेडछाडीच्या घटना शहरात वाढत असून, यावर नियंत्रण हवे. त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृह आणि महिला कक्षाची निर्मिती व्हायला हवी. -श्रेया रतन
नागरी सुविधांची गरजरस्ते, पाणी व वीज, असे शहरातील प्रश्न ऐरणीवर आले असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज आहे. सर्वप्रथम नागरी सुविधा सोडवाव्यात आणि त्यानंतर औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी कसे होईल यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी विचार करावा.-प्रथमेश दीक्षित
बेरोजगारी कमी करणारा नेता हवातरुणांना रोजगार मिळावा म्हणून अनेक सरकारी योजना आहेत; पण या योजनांचा लाभ सर्वसामान्य तरुणांना मिळताना दिसत नाही, अशा योजना तरुणांपर्यंत पोहोचवून आणि नवीन रोजगारनिर्मिती करून बेरोजगारी कमी करणारा लोकप्रतिनिधी असावा. -सोमीनाथ दगडघाटे
तंत्रज्ञानाची कास धरावीलोकसभा निवडणूक म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार केल्यास तंत्रज्ञानाची कास धरणारा लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानात झालेले बदल, सोशल मीडियाची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलणारा नेता हवा. -अजिंक्य दहीवड
शिक्षण क्षेत्रात बदल अपेक्षितलोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फक्त शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासावरही लक्ष देणे गरजेचे आहे. -उमेश ठोंबरे