औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आ. अब्दुल सत्तार यांची भाजपसोबत जवळीक वाढू लागल्यामुळे पक्षातील अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आ. सत्तार यांना पक्षात घेतल्यास मोठा परिणाम होईल. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन नये, याबाबत मुख्यमंत्र्यांना स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी लेखी कळवावे, असे मत काही संघटन पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे गुरुवारी सकाळी व्यक्त केल्याची माहिती आहे.
बुधवारी रात्री प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सूतगिरणी चौकातील बंगल्यावर मुकुंदवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर ते खाजगी विमानाने मुंबईला एका बैठकीसाठी गेले, त्यांच्यासोबत आ. सत्तार हेदेखील होते. आ. सत्तार आणि खा. दानवे हे एकाच विमानातून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची वार्ता भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सकाळपासूनच येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांकडे फोनवरून आपापल्या संतप्त भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी किंवा शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांची याप्रकरणी एक गुप्त बैठकदेखील होणे शक्य आहे. दरम्यान, खा. दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आ. सत्तार हे विमानात सोबत नव्हते. त्यांना भाजपचे सर्व दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले, तर आ. सत्तार म्हणाले की, खा. दानवे यांनी मला विमानातून मुंबईला का नेले, हे तेच सांगू शकतील, सध्या भाजपमध्ये जाण्याचा विषय नसल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
...तर भाजपचे राजकीय नुकसानभाजपमधील एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आ. सत्तार यांचा पक्ष प्रवेश झाल्यास पक्षाला मोठा फटका बसेल. औरंगाबाद आणि जालन्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला अप्रत्यक्षरीत्या त्याचा फायदा होईल. शिवसेनेला आपोआप ताकद मिळेल. त्यामुळे सत्तार यांना पक्षात घेण्यात येऊ नये, असा संदेश भाजप संघटनमंत्र्यांकडे पाठविला आहे. त्यासोबतच इतर नेत्यांनादेखील याबाबत कळविले आहे. त्यामुळे सत्तार यांचा पक्षप्रवेश होईल, अशी शक्यता सध्या तरी नाही. जर प्रवेश झाला, तर भाजपचे राजकीय नुकसान होईल, असे सदरील पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांशी दोन तास झाली चर्चा : अब्दुल सत्तारकाल रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्यासमवेत एकाच विमानात आम्ही मुंबईला गेलो व रात्रीच दोन तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली, असे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. या त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार नाही. कालच सत्तार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. ‘आ. इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करून मी मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी हैदराबादेत एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांचीही भेट घेणार आहे’ असेही सत्तार यांनी सांगितले. रावसाहेब दानवे यांच्याबरोबर कसे, असे विचारता सत्तार उत्तरले, आता मी अपक्ष आहे. त्यामुळे मी कुणासोबत जावे व कोणाबरोबर राहावे हा माझा प्रश्न आहे.