औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी वाटप केलेल्या व्होटर स्लीप चुकीच्या निघाल्या, तर काही मतदारांना केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारीदेखील मतदारांनी टोल फ्री क्रमांकावर केल्या; परंतु निवडणूक प्रक्रियेमुळे प्रशासनाकडून मतदारांचे समाधान झाले नाही.
बहुतांश परिसरात व्होटर स्लीप मिळाल्याच नव्हत्या. कुटुंबांची नावे एकाच यादीत व भाग क्रमांकांत यावीत, यासाठी राजकीय पक्षांनी मागणी केली होती. मात्र, त्याबाबत प्रशासनाने पाऊल उचलले नसल्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांना दोन ते तीन मतदान केंद्रांच्या व्होटर स्लीप आल्या आहेत. कडा आॅफिस खोली क्र.२, किड्स इंग्लिश स्कूल या मतदान केंद्रांवर पुंडलिकनगरमधील मतदान विभागले गेले. मतदारांची केंद्र शोधण्यात धावपळ झाली.
सिंधी कॉलनीतील मतदान केंद्र बदलण्यात आल्यामुळे मतदार मतदान न करताच परत गेले. शहरातील तिन्ही मतदारसंघातील मतदारांनी नावे गहाळ झाल्याची तक्रार केली आहे. मतदान केंद्राची पुनर्रचना होत असताना काही नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर गेली. ‘गो व्हेरीफाय’ हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबविला. २० मार्चपर्यंत या कार्यक्रमांतर्गत मतदारांनी स्वत:च्या नावाची शहानिशा करणे गरजेचे होते. ज्यांनी शहानिशा केली, ज्यांची नावे यादीत नाहीत, ती समाविष्ट करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले.
छावणीतील केंद्र बदललेल्या १ हजार २३१ मतदारांची अडचणलोकसभेसाठी मंगळवारी (दि.२३) झालेल्या मतदानात औरंगाबादेतील छावणीमधील मतदान केंद्र क्रमांक १२२ हे क्राईस्ट चर्च हायस्कूल येथून अचानक बदलून होलिक्रॉस इंग्रजी शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे या मतदान केंद्रावरील १,२३१ मतदारांना होलिक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचण्यास दिवसभर अडचण निर्माण झाली.