lok sabha election 2019 : काँग्रेसचा उमेदवार कोण? याचीच चर्चा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:32 PM2019-03-19T20:32:45+5:302019-03-19T20:33:05+5:30
हर्षवर्धन जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
- नजीर शेख
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी आता काँग्रेसकडून आमदार हर्षवर्धन जाधव यांचे नाव समोर आल्याने आणि वंचित आघाडीतर्फे एमआयएमचा उमेदवार मैदानात असेल, या घोषणेमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चांगलाच रंग भरण्याची चिन्हे आहेत.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मराठवाडास्तरीय मेळाव्याने युतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. युतीतर्फे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचे नाव निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. आ. सुभाष झांबड यांचे नाव काँग्रेसतर्फे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीकडे पाठविलेल्या नावांमध्येदेखील सुभाष झांबड यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत काँग्रेसने राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव टाकून काँग्रेस कार्यकर्त्यांना अचंबित करून टाकले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी तिसरे नाव कन्नडचे शिवसेना बंडखोर आमदार हर्षवर्धन पाटील यांचे असल्याचे सांगून आणखी मोठा धक्का दिला. आता जाधव यांचे नाव काँग्रेसतर्फे पुढे आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
एमआयएममुळे कॉंग्रेसची अडचण
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे हे राजकीयदृष्ट्या प्रबळ आहेत. युती झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु असतानाच एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर करून काँग्रेसची अडचण केली आहे. या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतांची संख्या पाहता युती आणि काँग्रेस आघाडी या दोन्हींच्या संघर्षात वंचित आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी त्यांची अटकळ आहे. एमआयएमकडून औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांचे नाव सर्वात पुढे आहे. काँग्रेसकडून नावे चर्चेत आहेत. मात्र, कोणता उमेदवार असेल हे निश्चित मानले जाऊ शकत नाही.
काँग्रेससमोर मोठे आव्हान
नगरसेवकपदापासून खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करेपर्यंत पराभव न पाहणारे, तसेच अंतुले यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करण्याची क्षमता असणाऱ्या खैरे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देणे हे काँग्रेसमोरील मोठे आव्हान आहे. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये खैरे निवडून आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच अधिक चर्चा होत असते. यावेळीही ही चर्चा चालूच आहे.