औरंगाबाद : प्रधानमंत्रीपदी पुन्हा नरेंद्र मोदी येणार? औरंगाबाद लोकसभेची लढत कशी होणार ? सेनेला भाजप आणि काँग्रेसला राष्ट्रवादी किती मदत करणार ? इतर उमेदवार कोण असणार? वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचा उमेदवार किती मते घेणार? अशा चर्चांना विद्यापीठातील विविध ठिकाणी, महाविद्यालयातील कट्ट्यांवर उधाण आले आहे. यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक हिरीरीने सहभागी होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असून, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण उमेदवार राहतील, अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाजपमधील प्रवेशामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सुटणार नाही, अशी मतेही नोंदविली जात होती. यातच शुक्रवारी उशिरा कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता चर्चा खैरे विरुद्ध झांबड अशीच रंगत आहे. हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा दंड थोपटले असून एमआयएमसुद्धा लढत देणार आहे. या साऱ्या घटनांवर नागरिकांचे लक्ष आहे.
औरंगाबाद शहरातील समस्यांचा पाडा वाचताना विद्यमान खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी चर्चाही रंगात आहे. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर असल्याचे अनेक जण बोलताना दिसतात. विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापक, प्रशासकीय इमारतीमधील कर्मचारीही या चर्चांत सहभागी होत आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासिकेच्या बाहेर विद्यार्थी औरंगाबादसह राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत काय होणार, याविषयी आडाखे बांधत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समर्थक आणि विरोधक यांच्यात शाब्दिक बाण चालविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया संशोधक विद्यार्थी रवी कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नोकरभरती, बेरोजगारीवरून युवकांमध्ये संतापमहाविद्यालय, विद्यापीठातील युवकांमध्ये मागील तीन वर्षांपासूून विविध नोकरभरतीवर घातलेली बंदी, बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण यावरून संताप व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या अगोदर नोकरभरतीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यात पुढे काहीच झाले नाही, अशी भावना संशोधक विद्यार्थी श्रीराम फरताडे यांनी व्यक्त केली. ७२ हजार जागा भरण्याचेही गाजरच दाखविले असल्याचे मत शामराव रुद्रे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.