- विशाल सोनटक्के
नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी विजय मिळविला होता़ त्यामुळे याही निवडणुकीत मोठ्या आत्मविश्वासाने काँग्रेस रिंगणात उतरली आहे़, तर दुसरीकडे भाजपाने शिवसेनेचे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरविल्याने नांदेडमधील लढत लक्षवेधी ठरत आहे़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सक्रीय सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे़ तर चिखलीकर यांना नाराज निष्ठावंत भाजपासह संतप्त शिवसैनिकांचीही मनधरणी करावी लागत आहे़ सध्या ही मते द्विधा मन:स्थितीत काठावर असल्याचे दिसून येते़
उमेदवारीसाठी भाजपातील चार -पाच जण प्रयत्नशील होते़ मात्र ऐनवेळी शिवसेनेचे आमदार असलेल्या चिखलीकरांच्या गळ्यात भाजपाने उमेदवारीची माळ टाकली़ यामुळे इच्छुक उमेदवाराबरोबरच भाजपातील निष्ठावंत गटही नाराज आहे़ दुसरीकडे शिवसैनिकातही चिखलीकरांविरोधात खदखद आहे़ शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा न देता मनपा निवडणुकीत चिखलीकरांनी भाजपाच्या प्रचाराची सूत्रे स्वीकारली़ त्यावेळी सेनेच्या जिल्हा प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्यांनाही चिखलीकरांनी फोडले़ याचाही रोष आहे़ त्यामुळेच हिंगोलीच्या शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाण्याची नांदेडमधील या नाराज शिवसैनिकांनी तयारी सुरू आहे़ नाराज शिवसैनिकांची मने वळविण्याची कसरत सध्या चिखलीकर करीत आहेत.
काँग्रेसकडून चव्हाण कुटुंबियापैकी एक जण रिंगणात उतरणार हे स्पष्ट असल्याने पक्षाने मागील काही महिन्यापासूनच गाठीभेटी सुरू केल्या होत्या़ त्यामुळे तूर्त तरी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसते़ काँग्रेससमोरही राष्ट्रवादीचा सक्रीय सहभाग मिळविण्याचे आव्हान आहे़ स्थानिक स्वराज्य संस्थात काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळ आजमावले़ त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले होते़ अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर व माजीमंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेवून चर्चा केली़ दोन्ही नेत्यांनी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे़ प्रत्यक्षात ते कितपत प्रचारात सक्रीय होतात, हे समजण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.
प्रमुख उमेदवारअशोक चव्हाण । काँग्रेसप्रताप पाटील । भाजपायशपाल भिंगे । वंचित आघाडी
कळीचे मुद्देलोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे यंदा प्रथमच तिरंगी सामना रंगला आहे़ या निवडणुकीत आघाडीची मते निर्णायक ठरतील़ मतदानासाठी अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी आहे़ या अत्यल्प दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे़
कॉंग्रेससोबत मतदारांचे अतूट नाते नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी माझ्यावर वारंवार विश्वास दाखविला आहे़ काँग्रेससोबत नांदेडकरांचे हे नाते अतुट आहे़ याही निवडणुकीत मतदार काँग्रेसच्याच पाठीशी राहतील़ ज्या पक्षाला स्वत:चा उमेदवार मिळत नाही, ते काँग्रेससोबत काय लढणार? केलेली कामे जनतेत घेऊन जाऊ. - अशोक चव्हाण, काँग्रेस
एकजुटीने प्रचार होईल भाजपा आणि शिवसेना पक्षश्रेष्ठींनी चर्चा करूनच मला युतीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे़ त्यामुळे दोन्ही पक्ष एकजुटीने प्रचाराला लागलेले दिसतील़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत़ त्यामुळे मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे़ - प्रताप पाटील, भाजपा