Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार बदलणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:28 PM2019-03-25T12:28:21+5:302019-03-25T12:31:25+5:30
कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून तिकीट बदलून देण्याचे आश्वासन
औरंगाबाद : मी भाजप मध्ये जाणार नाही, माझे नेते अशोक चव्हाण असून मला कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबाद लोकसभेचे तिकीट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती बंडखोर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कॉंग्रेसकडून औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली. आपण औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर करताच पक्षातील अंतर्गत कलह समोर आला. यातच शनिवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका माडंली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अब्दुल सत्तार म्हणाले, सिल्लोडसाठी भरीव निधी दिल्याबद्दल मी त्यांचे भेटून आभार मानले आहेत. मी भाजपमध्ये जाणार नसून अशोक चव्हाणच माझे नेते आहेत असेही ते म्हणाले.
२९ मार्चला निर्णय घेणार
मला कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून औरंगाबाद किंवा जालना कोठूनही लढा तेथील तिकीट बदलून देण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे सत्तार यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात २९ मार्चच्या कार्यकर्ता मेळाव्यात निर्णय घेऊ असेही सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.