औरंगाबाद - मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगत जालना मतदारसंघातून माघार घेतली आहे.
औरंगाबाद येथे आज शिवसेना-भाजपचा कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे त्याठिकाणी बोलताना अर्जुन खोतकर यांनी जालना मतदारसंघातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. मेळाव्याआधी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली या बैठकीत खोतकर यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आल्याचे दिसून आलं.
कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, माझ्यासाठी उद्धव ठाकरे यांचे आदेश अंतिम आहेत. रावसाहेब दानवेंना जिंकून आणू असा विश्वास व्यक्त केला.
मागील अनेक दिवसांपासून खोतकर-दानवे यांच्या शीतयुद्धामुळे जालना लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची चर्चा सुरु होती. अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस नेत्यांच्याही भेट घेतली होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार अशा चर्चा मतदारसंघात सुरु होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीने रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाली आहे.
दानवे आणि खोतकर यांच्या मनोमिलनाने नेते आनंदी झाले असले तरी गेली 5 वर्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसैनिकांनी दिलेली वागणूक, खोट्या केसेस मध्ये कार्यकर्त्यांना अडकवण्याचा आरोप त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते सच्चा दिलाने दानवे यांचा प्रचार करतील का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.