लोकसभेत असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करणारा नेता हरपला
साठच्या दशकात मुंबईसारख्या शहरात टॅक्सी, रिक्षा, हॉटेल कामगार, फेरीवाले इ. असंघटित कष्टकऱ्यांना संघटित करून देशात सर्वप्रथम न्याय देण्याचे काम जॉर्ज फर्नांडिस यांनी केले. आयुष्यभर संघर्ष केलेल्या जॉर्ज यांनी गेल्या दहा वर्षांपासून जीवघेण्या आजाराशी संघर्ष केला. डॉ. राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यात जॉर्ज यांचे मोठे योगदान होते. जॉर्ज यांनी शेवटपर्यंत कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांचा विचार करीत आयुष्य व्यतीत केले. १९६७ साली बलाढ्य अशा स.का. पाटलांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले होते. इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू व मराठी भाषांवर प्रभुत्व असणारे व आपल्या भाषणात लाखो लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे जॉर्ज फर्नांडिस हे एकमेव नेते होते. आणीबाणीतील डायना माईट केस व जेलमध्ये झालेला छळ यामुळे आणीबाणी उठविल्यावर १९७७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. शेवटच्या काळात भाजपबरोबर जाण्याची चूक केली नसती, तर ते आज पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार राहिले असते, यात शंका नाही.
- सुभाष लोमटे
..................
स्वातंत्र्योत्तर काळातील मोठा कामगार पुढारी हरपला
स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठा कामगार पुढारी हरपला, अशा शब्दांत समाजवादी जन परिषदेचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, त्या काळात दुहेरी निष्ठेच्या संदर्भातील लोकसभेतील त्यांची भूमिका गाजली होती. निष्ठा संविधानावर की सांस्कृतिक संघटनांवर असा तो मुद्दा होता. या मुद्यावरच त्यांनी जनता पक्षाचे सरकार पाडले होते. सर्व घटकातील चळवळींबरोबर संबंध असलेला हा पुढारी होता. शिवसेनेच्या आधी मुंबई बंद करणारा हा एकमेव नेता होता. विकासाला मोठे योगदान देणारे हे नेतृत्व होते. समाजवाद्यांमधील आघाडीचा लढवय्या नेता आज निघून गेला. समाजवादी जन परिषदेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- विष्णू ढोबळे
..........................
धावती मुंबई बंद पाडणारा नेता गमावला
जॉर्ज फर्नांडिस म्हणजे संघर्ष. लहान-लहान धंद्यातील कामगारांना संघटित करून मुंबई बंद पाडण्याची क्षमता असलेलेएक विलक्षण व्यक्तिमत्त्व. भल्याभल्यांच्या उरात धडकी बसविण्याची ताकद त्यांनी संघटनेमार्फत उभी केली, अशा आठवणी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अण्णासाहेब खंदारे यांनी जागविल्या. १९६७ मध्ये शेतकरी, आदिवासींच्या प्रश्नासाठी लोकसभेवर त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चावर अमानुष लाठीमार करण्यात आला. जॉर्ज फर्नांडिस आणि मधू लिमये यांना टार्गेट केले गेले. पोलिसांच्या मारहाणीत फर्नांडिस मरण पावले, असे पोलिसांना वाटले. मात्र, अशा जीवघेण्या हल्ल्याला त्यांनी लीलया परतवले. आणीबाणीत भूमिगत राहून देशभर लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांना बडोदा डायनामाईट केसमध्ये अडकवले व पकडल्यावर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, अशा वादळी व्यक्तिमत्त्वाचा आज अंत झाला. तरुणपणात आमच्यासारख्या अनेकांचा आदर्श असलेल्या समाजवादी नेत्यास विनम्र अभिवादन.
- अण्णासाहेब खंदारे
...................................
एक वादळ विसावले ‘कर्नाटकात ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला एक तरुण फादर व्हायचे नाकारून मुंबईला आला. कधी फुटपाथवर झोपला. पी डिमेलो या कामगार पुढाऱ्याच्या हाताखाली तयार झाला आणि पुढे तो एक वादळ ठरला. त्याचे नाव जॉर्ज फर्नांडिस. आज हे ‘वादळ विसावले’, अशा शब्दांत प्रख्यात समाजवादी विचारवंत व नेते साथी पन्नालाल सुराणा यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, मुंबई शहरातील मनपाच्या कामगारांना विशेषत: सफाई कामगारांना जॉर्ज फर्नांडिस यांनी संघटित केले. कामाचे तास पक्के व्हावेत, दरमहा नियमित पगार मिळावा, यासाठी त्यांनी संप घडवून आणला. मध्यमवर्गीयांनी नाके मुरडून जॉर्जना शिव्याशाप दिले; पण जॉर्ज एकेदिवशी रेल्वेस्टेशनवर उभा राहिला. रेल्वेवाहतूक बंद पडली. पोलिसांनी उचलून त्याला खूप बदडले. विमानाने नागपूरच्या तुरुंगात नेऊन ठेवले; पण कामगारांनी निर्धाराने लढा लढवला. त्यानंतर मुंबईमधील टॅक्सीवाल्यांना स्वत:ची गाडी विकत घेता यावी म्हणून न्यू इंडिया को-आॅप बँक स्थापन केली. त्या बँकेतर्फे टॅक्सीवाल्यांना वाहने विकत घेता आली. त्यांची पिळवणूक थांबली. पोलीस फेरीवाल्यांना छळायचे. फर्नांडिसांनी त्यांचा लढा उभारला. पुढे एसटी कामगारांचा संप केला. १९७४ साली देशभरातील रेल्वे कामगारांचा संप केला. २०-२० वर्षे काम केलेल्यांना कायम केले. जनता सरकारात ही मागणी मान्य झाली. रेल्वेमंत्री या नात्याने फर्नांडिसांनी कोकण रेल्वेचे काम पूर्ण केले. एकाच वेळेला लढाऊ व रचनात्मक काम करण्यावर जॉर्ज आघाडीवर राहिले. १९६७ साली त्यांनी मतदारांना सांगितले की, तुम्ही स. का. पाटील यांचा पराभव करू शकता आणि खरेच तसे घडले. जॉर्ज फर्नांडिस हे कामगारांचे स्फूर्तिदायी नेतृत्व होते. मंत्री असताना त्यांनी पोलीस संरक्षण नाकारले. जम्मू काश्मीरमध्ये जाऊन अतिरेक्यांशी चर्चा करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते. अशी अनेकविध कामे त्यांनी केली. देशाचा एक मोठा नेता हरपला, याचे दु:ख आहे, असे साथी सुराणा यांनी नमूद केले.
- पन्नालाल सुराणा