छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील जागा वाटपात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले असून, पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अन्य दोन उमेदवार शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.
शिवसेना प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना महायुतीचे जागावाटप मंगळवारी जाहीर होईल आणि त्याच दिवशी उमेदवारांची घोषणा होईल, असे सांगितले होते. परंतु होळीपाठोपाठ धुळवडही संपली तरी उमेदवार जाहीर झाले नाहीत. औरंगाबादच्या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून दावा सांगितला जात होता. मात्र, औरंगाबाद हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून, या जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. पैकी पाच शिंदे गटात आहेत. त्यामुळे शिवसेनेची (शिंदे गट) ताकद अधिक असल्याने या मतदारसंघावर त्यांनी केलेला दावा प्रबळ ठरला असून, ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आल्याचे समजते.
जागा मिळाली तरी उमेदवार कोण, हा मोठा प्रश्न शिवसेना शिंदे गटासमोर आहे. मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नसल्याने ते कितपत इच्छुक आहेत, याविषयी साशंकता आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासाठी शिंदे गटाकडून खूप प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यास नकार दिल्याने शिंदे गटाची पंचाईत झाली. आता राजेंद्र जंजाळ अथवा विनोद पाटील यांची नावे पुढे येत आहेत.