औरंगाबाद : इम्रान पटेलची फलंदाजी आणि कर्णधार सर्फराज सय्यद याची सुरेख गोलंदाजी या बळावर शक्ती स्ट्रायकर्स संघाने आपल्या पदार्पणात ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, या पराभवाबरोबरच ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडच्या उपांत्य फेरीतील आशा संपुष्टात आल्या आहेत. अ गटात याआधीच मनजीत प्राईड वर्ल्डने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
गतविजेत्या ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड संघाला ८ बाद १३१ धावांमध्ये रोखल्यानंतर विजयी लक्ष्य शक्ती स्ट्रायकर्स संघाने १३.४ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले. त्यांच्याकडून महाराष्ट्राचा रणजीपटू अझीम काझी याला सणसणीत कव्हर ड्राइव्हचा चौकार मारणाऱ्या इम्रान पटेलने २८ चेंडूंतच ८ चौकार व एका षटकारासह ५२ धावांची निर्णायक खेळी केली. तसेच वसीम शेखला सलग दोन षटकार ठोकणाऱ्या अष्टपैलू राहुल जोनवाल याने १३ चेंडूंत एक चौकार, ३ षटकारांसह नाबाद ३० धावांची खेळी करत शक्ती स्ट्रायकर्सचा विजय सोपा केला. जबरदस्त फाॅर्ममध्ये असणाऱ्या नयन चव्हाण याने २६ चेंडूत एक चौकार, एका षटकारासह २८ धावांची खेळी केली. ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडकडून सुफियान अहमदने २३ धावांत २ व वसीम शेखने १ गडी बाद केला.
त्याआधी अनुभवी खालेद कादरी आणि माेहमद आमेर यांनी ३२ चेंडूंत केलेल्या ५४ धावांच्या भागीदारीच्या बळावर ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड संघाने १५ षटकांत ८ बाद १३१ धावा फटकावल्या. खालेद कादरीने २८ चेंडूंतच ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावा केल्या. सुदर्शन एखंडेने २० चेंडूंत ४ चौकारांसह २७, मोहमद आमेरने १७ आणि वसीम शेखने ५ चेंडूत एक चौकार, २ षटकारासह १८ धावा केल्या. शक्ती स्ट्रायकर्सकडून कर्णधार सय्यद सर्फराजने सुरेख गोलंदाजी करताना ३ षटकांत फक्त ८ धावा देत २ गडी बाद केले. प्रवीण कुलकर्णीने २२ धावांत २ व राहुल जोनवालने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलकग्रीन गोल्ड सान्या युनायटेड : १५ षटकांत ८ बाद १३१. (खालेद कादरी ४२, सुदर्शन एखंडे २७, वसीम शेख १८. सय्यद सर्फराज २/८, प्रवीण कुलकर्णी २/२२, राहुल जोनवाल १/३९.)शक्ती स्ट्रायकर्स : १३.४ षटकांत ३ बाद १३२. (इम्रान पटेल नाबाद ५२, राहुल जोनवाल नाबाद ३०, नयन चव्हाण २८, आर्यन शेजूळ १२. सुफियान अहमद २/२३, वसीम शेख १/२८).