औरंगाबाद : एखादा सोहळा, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभियान यशस्वी करण्यासाठी त्यामागे शेकडो जण राबत असतात. या पडद्यामागील काम करणाऱ्या लोकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आज, बुधवारी १ सप्टेंबर रोजी लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’च्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत, कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केला जातो, ज्याद्वारे त्यांना आणखी उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन मिळते. शिवाय समाजातील अन्य लोकांना या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यापासून प्रेरणा मिळते. वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ‘लोकमत समूहा’तर्फे वर्षभरात २५० ते ३०० दरम्यान लहान-मोठे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाची माहिती बातमीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचतेच; पण उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी दिवस-रात्र राबणाऱ्या व्यक्ती जगासमोर कधीच येत नाहीत. उपक्रमाची कल्पना, कल्पकता, त्याची अंमलबजावणी, सोहळा यशस्वी पार पडेपर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या अनेक इव्हेंट ग्रुपला दिलेल्या असतात. स्टेज डेकोरेशन, एलईडी वॉल, लाईटिंग, साऊंड सिस्टीम, मंडप, व्हिडिओ, केटरिंग असे अनेक व्यावसायिक तसेच इव्हेंट कंपन्या यात सहभागी होत असतात. या सर्वांच्या एकसंध प्रयत्नातून उपक्रम यशस्वी होत असतो. यातील इव्हेंट क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या या व्यक्ती, संस्थांचा गौरव ‘लोकमत’तर्फे करण्यात येणार आहे.
‘लोकमत वूमन अचिव्हर्स अवाॅर्ड’मध्येच ‘लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवारी दुपारी २.३० वाजता लोकमत भवन येथे होणार आहे. आदिती सारंगधर ही अभिनेत्री या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
चौकट
लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्डने यांचा होणार सत्कार
इव्हेंट क्षेत्रातील राहुल बोधनकर (बोधनकर इव्हेंट एलएलपी), शेख कथनेश्वर (कॅची इव्हेंट), पुरुषोत्तम जयपुरीया (मधुर वास्तू भंडार), मुकेश तिवारी (मीडिया हाऊस), नीलेश सातोनकर (मल्टिमीडिया इव्हेंट ॲण्ड एक्झिबिशन), नितीन मुगदिया (नम्रता कॅटरर्स), संदीप काळे (संदीप साऊंड), मनोज बोरा (सिद्धी डेकोर) आणि प्रमोद सरकटे (स्वराज संगीत) या मान्यवरांना लोकमत इव्हेंट एक्सलंस अवॉर्ड देण्यात येणार आहे.