औरंगाबाद : थंडगार हवामान, मध्येच पावसाची संततधार आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणात लोकमत समूहाच्या पथकाने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर समजल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर लोकमत महामॅरेथॉनचा झेंडा फडकावण्याचा नुकताच भीमपराक्रम केला.
लोकमत समूहातर्फे गत दोन वर्षांपासून मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केले जाते. या महामॅरेथॉनला देशभरातील आणि परदेशातील लाभलेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे वैशिष्ट्य ठरले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठरणारी लोकमत महामॅरेथॉन या वेळेस पाच शहरात रंगणार आहे. त्यात पुणे महामॅरेथॉनचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यंदा नाशिक येथे २ डिसेंबरपासून महामॅरेथॉनचा श्रीगणेशा होणार आहे. त्यानंतर सलग तिसऱ्या वर्षी औरंगाबाद येथे १६ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. त्यानंतर कोल्हापूरला ६ जानेवारी, नागपूरला ३ फेब्रुवारी आणि पुणे येथे १७ फेब्रुवारीला महामॅरेथॉन रंगणार आहे. याची सुरुवात लोकमत समूहाच्या पथकाने इंडियन कॅडेट फोर्सच्या सहकार्याने अनोख्या रीतीने केली आहे. जबरदस्त पाऊस, धुके, हिरवीगार झाडे आणि नयनरम्य अशा निसर्गरम्य वातावरणात महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर लोकमत महामॅरेथॉनचा झेंडा फडकावून करण्यात आली.
समुद्रसपाटीपासून पाच हजार ४ फूट उंचीवर असणाऱ्या या शिखरावर झेंडा रोवणाऱ्या लोकमत समूहाच्या पथकात संदीप देऊळगावकर, अभिषेक कुंटे, अभय भोसले, ऋषिकेश वाळेकर हे होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल अहिरे, किशोर नावकर, रत्नदीप देशपांडे, चेतन सरोदे, मनीष पहाडिया, सूरज सुलाने, शोएब पठाण, विशाल काकडे, संदीप शिंगणे, मानसी शेळके, रणजित पवार आदींनी परिश्रम घेतले.