विजय सरवदे
छत्रपती संभाजीनगर : पहाटेची गुलाबी थंडी, विभागीय क्रीडा संकुलाच्या दिशेने झेपावणारी पावले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील सळसळता उत्साह, मनात अभूतपूर्व आत्मविश्वास, लक्ष ध्येयाकडे आणि मनात जिद्द फक्त जिंकण्याची! बरोबर ५:३० वाजता आबालवृद्धांची गर्दी धावण्यासाठी सज्ज झाली आणि काउंटडाउन सुरू झाले... फाइव्ह... फोर... थ्री... टू... वन ॲंड नाऊ स्टार्ट... हे शब्द कानावर पडताच एका क्षणात हजारो पावलांनी ध्येय्याकडे कूच केली. नयनरम्य आतषबाजी, ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात बेभान झालेले शहरवासीय रविवारी सुसाट धावले.
निमित्त होते... मुख्य प्रायोजक बाकलीवाल अँड सन्स तसेच पॉवर्ड बाय मिस्ट्रेस फूड राइट प्रस्तुत ‘लोकमत संभाजीनगर महामॅरेथॉन’चे! या महामॅरेथॉनच्या सातव्या पर्वाने आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड मोडले. सहभागी धावपटूंचा ‘लोकमत महामॅरेथॉन, कर दे धमाल’ या जयघोषाने आसमंत निनादला. या स्पर्धेचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ट्य असे की, सहकुटुंब, मित्रपरिवार, आएएस अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच शासकीय अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह अनेक संस्था- उद्योगांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवत धावण्याचा आनंद लुटला.
शहरात ठिकठीकाणी ढोल-ताशांचा गजर, भजन, देशभक्तिपर ऊर्जा वाढविणारी गाणी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या ‘चिअर अप’ने धावपटूसंह प्रेक्षकांचा उत्साह वाढविला. यावेळी सत्तरी पार केलेल्या धावपटू आजोबा आणि आजींचा गगनाला गवसणी घालणारा आत्मविश्वास आणि तरुणाईच्या जिद्दीला शहरवासीयांनी दिलेला अपूर्व प्रतिसाद पाहण्याजोगा होता.
‘फ्लॅग ऑन’ करून पहाटे ५:५० वाजता सर्वांत प्रथम २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. त्यानंतर दहा मिनिटांच्या अंतराने १० किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किमी अंतराच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. स्टार्टिंग पॉइंटवर सुटतेवेळी प्रत्येक गटातील स्पर्धकांना प्रोत्साहित करताना ढाेल-ताशा, तुतारी तसेच आतषबाजीने चांगलाच रंग भरला. मैदानावर उपस्थित असणाऱ्या क्रीडाप्रेमींनी टाळ्यांचा गजर करीत शुभेच्छा दिल्या. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट, सखी मंचच्या संस्थापिका आशू दर्डा, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा, कुणाल बाकलीवाल, डॉ. सुरूची बाकलीवाल, नितीन बगडीया, विक्रम बोहरा, अनिमेश सिंग, हरलीन कौर, आदेशकुमार छाजेड, जयंत गोरे, प्रज्ञा गोरे, रेस डायरेक्टर संजय पाटील यांच्या उपस्थितीत शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली.