औरंगाबाद : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदानाच्या राज्यस्तरीय महायज्ञाचा शुभारंभ आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लोकमत भवन येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. कोरोना प्रादुर्भावात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, शासकीय-अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरभरून सहभाग नोंदविला. ( Lokmat Raktachenate : The state level Mahayagna of blood donation was launched in Aurangabad )
लोकमत भवन येथे महारक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यभरात कोरोना प्रादुर्भावामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, अपघातग्रस्तांसह गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे ‘लोकमत’ने महारक्तदान शिबिराचे राज्यभर आयोजन केले आहे. औरंगाबाद येथे आयोजित शिबिरास रक्तदात्यांनी सकाळपासूनच मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. महारक्तदान शिबिराच्या शुभारंभानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनीही रक्तदान केले. त्यांची रक्तदानाची ही २६ वी वेळ होती. शिबिरात पहिल्या वेळी रक्तदान करणाऱ्यापासून ११५ व्या वेळी रक्तदान करणाऱ्यांचा सहभाग होता .
प्रमाणपत्रासह छायाचित्र, सेल्फीरक्तदान केल्यानंतर दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्रासह आणि ‘लोकमत रक्ताचं नातं’ असे घोषवाक्य असलेल्या सेल्फी पाॅइंटवर रक्तदाते छायाचित्र, सेल्फी घेत होते. अनेकांनी आपले छायाचित्र सामाजिक माध्यमांवर शेअर करीत रक्तदानाचे आवाहन केले. ...यांनी नोंदविला सहभागऔरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, ऑटोमोबाईल्स टायर्स ॲण्ड डिलर्स असोसिएशन, सीए संघटना, औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप, महावितरण अधिकारी-कर्मचारी, तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, शिक्षक संघटना, पोलीस अधिकारी-कर्मचारी, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नमोकार एसएमएस सेवा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आदींनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलनशिबिरात घाटीतील विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. विभागीय रक्तपेढीतर्फे विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी, रक्तपेढी प्रमुख डाॅ. सुरेश गवई, रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. सिम्मी मिंज, डाॅ. प्राची मोडवान, डाॅ. दीपमाला करंडे, डाॅ. पूजा लगसकर, डाॅ. तेजस्विनी जाधव, जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, तंत्रज्ञ पूजा जांगीड, देवकुमार तायडे, मजहर शेख, बबन वाघ, अविनाश देहाडे, मनोज पंडित, हमास शेख, प्रतीक्षा गायकवाड, स्नेहा अक्कलवार यांनी रक्तसंकलनासाठी परिश्रम घेतले. तर लायन्स ब्लड बँकेतर्फे डाॅ. प्रकाश पाटणी, डाॅ. एजाज पठाण, जनसंपर्क अधिकारी मनोज चव्हाण, अनिलकुमार शर्मा, निलेश इंगल, सूर्यकांत तांबे, अश्विनी नरवडे, झाकेर माेहंमद, संदीप वाघमारे, नागेश हिवराळे, अविनाश सोनवणे, भारती अंध्याल यांनी रक्तसंकलन केले.