लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत. स्वत:च्या हिंमतीवर आणि स्वबळावर यशाची शिखरे पादाक्रांत करणा-या महिलांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कारा’चे आयोजन केले जाते.महिला सक्षमीकरणात सदैव अग्रेसर असलेल्या ‘लोकमत’ समूहातर्फे औरंगाबाद शहरातील ध्येयवेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरिता त्यांचा ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. २०११ साली नागपूर येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. यंदा या पुरस्काराचे सातवे वर्षे आहे. एका बाजूला संसार आणि दुसºया बाजूला नोकरी किंवा व्यवसाय, अशी तारेवरची कसरत करीत यशोशिखर गाठणा-या अनेक महिला समाजात आहेत. वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक, शौर्य, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या सखींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा गौरव पुरस्कार सखी मंचच्या सदस्यांपुरताच मर्यादित नाही. अन्य महिला यात सहभागी होऊ शकतात.या पुरस्कारासाठी आपले नाव देण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आपला बायोडाटा, छायाचित्र (पासपोर्ट साईज), उल्लेखनीय कार्याची माहिती, मिळालेले पुरस्कारांची नावे आदींची एक फाईल लोकमत कार्यालय, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद या पत्त्यावर १८ नोव्हेंबरपर्यंत पाठवावी. पाकिटावर ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ असा उल्लेख अवश्य करावा.
कर्तृत्ववान महिलांसाठी ‘लोकमत’ सखी सन्मान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:29 AM