वाळूज महानगर : थकीत पाणीबीलाच्या वसुलीसाठी म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच म्हाडा प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पाणीपुरवठा सुरु केला. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.
तीसगाव ग्रामपंचायत हद्दीतील म्हाडा कॉलनी नागरी वसाहतीला म्हाडा प्रशासनाकडून विकत पाणी घेवून पाणीपुरवठा केला जातो. नागरिकही म्हाडाकडेच पाणीबीलाचा भरणा करतात. परंतू काही दिवसांपासून बीलाच्या वसुलीसाठी कर्मचारी येत नसल्याने रहिवाशांना बील भरण्यासाठी शहरातील म्हाडा कार्यालयात जावे लागत आहे.
या भागात बहुतांश कामगार असल्याने कार्यालयीन वेळेत बील भरण्यासाठी जाणे अशक्य होत आहे. त्यामुळे अनेकांकडे बील थकित आहे. प्रशासनाने वसुलीसाठी कर्मचारी नेमण्याऐवजी चक्क वसाहतीचा पाणीपुरवठाच बंद केला. यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.
लोकमतने २७ आॅक्टोबर रोजी म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा बंद या मथळ्याखाली १५ दिवसांपासून नागरिकांचे हाल होत असल्याचे वृत्त प्रकाशित करुन नागरी प्रश्नाला वाचा फोडली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या म्हाडा प्रशासनाने म्हाडा कॉलनीचा पाणीपुरवठा सुरु केला. दोन आठवड्यांपासून बंद असलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रहिवाशांनी मानले लोकमतचे आभारलोकमतच्या वृत्ताची दखल घेवून म्हाडा प्रशासनाने सोमवारी सकाळी ८ वाजता प्रशासनाने पाणी पुरवठा सुरु केला. लोकमतमुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने ग्रा.पं. सदस्य वैशाली हिवाळे यांच्यासह संजय जगताप, नागेश कुठारे, शिवाजी हिवाळे, दादासाहेब रगडे, अशोक वानरे, शिवाजी राऊत, दिनेश खिराडे, कल्पना वाघमारे यांच्यासह रहिवाशांनी लोकमतचे आभार मानले.