- राम शिनगारे
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकांमध्ये नाराजांना संधी नाकारल्यानंतर अपक्ष उभे राहून नशीब अजमावण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. लोकसभेच्या १३ निवडणुकांमध्ये १०० अपक्षांनी नशीब अजमावले. त्यातील शिवसेनेने पाठिंबा दिलेले मोरेश्वर सावे यांचा अपवाद वगळता एकालाही विजय संपादन करता आला नाही. २००९ साली शांतीगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार २६ एवढी मते घेत अपक्षांमध्ये सर्वाधिक मते घेण्याचा पराक्रम केला आहे.
देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना १९५२ साली सुरुवात झाली. पहिल्या तीन लोकसभा निवडणुका होईपर्यंत औरंगाबादेत दुहेरीच लढत झाली. १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला. एमएसपीएफ मोहम्मद यांनी या निवडणुकीत १७ हजार २६६ मते घेतली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढतच गेली. १९७१ साली तीन अपक्षांनी नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अत्यल्प मते मिळाली. १९७७, १९८० च्या निवडणुकीत अपक्षांना उपद्रव मूल्यही दाखविता आले नाही.
१९८४ च्या निवडणुकीत अंडरवर्ल्डचा डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित-मुस्लिम अल्पसंख्याक महासंघाने पाठिंबा दिलेले खालीद जहीद यांनी ९.१० टक्के मते घेतली. याच निवडणुकीत ‘भारिप’चा पाठिंबा असणारे बी. एच. गायकवाड यांनीही ४.४७ टक्के मते घेतली होती. या दोघांना अनुक्रमे ४३ हजार ८७५ आणि २१ हजार ५४६ मते घेतली होती. ही निवडणूक हाजी मस्तान यांच्या प्रचार सभांमुळे चांगलीच गाजली होती. १९८९ साली शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत त्यांना ३ लाख २२ हजार ४६७ मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार ६४३ मते मिळाली. यात मोरेश्वर सावे १७ हजार ८२४ मतांनी निवडून आले.
१९९१ साली झालेल्या निवडणुकीत तब्बल १६ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणाचेही डिपॉझिटही वाचले नाही. १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेने मोरेश्वर सावे यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याचवेळी तेजस्विनी रायभान जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यात सावे यांना ४२ हजार ९२७ आणि जाधव यांना २३ हजार २८४ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर अपक्ष उमेदवारांची संख्याही आगामी ३ लोकसभा निवडणुकीत १, २ आणि ३ एवढी मर्यादित होती.
२००९ साली झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांची चांगलीच दमछाक केली. त्यांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. या निवडणुकीत इतर अपक्षांना मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत १७ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणालाही यश मिळाले नाही. यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत १० अपक्ष नशीब अजमावत आहेत. त्यात कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांचा समावेश असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
वर्ष अपक्ष१९६७ ११९७१ ३१९७२१९८० ७१९८४ १११९८९ ८१९९१ १६१९९६ १६१९९८ ११९९९ २२००४ ३२००९ १३२०१४ १७------------------एकूण १००चौकटनिवडणूक : २०१९एकुण : १३अपक्ष : १०