औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीच्या औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना पाणीटंचाईने घाम फोडला आहे. पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले.
जालना लोकसभा मतदारसंघातील ११ वॉर्डांतील पाणीटंचाईच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची तक्रारही करण्यात आल्याची माहिती युतीच्या सूत्रांनी आयुक्तांच्या भेटीनंतर दिली. निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पाणीपुरवठ्यावरून रान पेटले आहे. औरंगाबाद व जालना-औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघांतील वॉर्डांमध्ये महापालिकेचा विस्तार आहे. मागील काही महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. शहरातील ११ वॉर्ड जालना मतदारसंघात असल्यामुळे तिकडील मतदार प्रचार पदयात्रांमधून उमेदवाराला प्रश्न करीत आहेत, तर औरंगाबाद शहरातील उमेदवारावरही मतदार पाणीटंचाईमुळे खापर फोडू लागले आहेत.
शहरात १३० एमएलडी पाणी येते. त्याचे वितरण चुकीच्या पद्धतीने होत आहे. काही ठिकाणी दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर कुठे सात दिवस पाणी येत नाही. एक्स्प्रेस जलवाहिनीवर गळती करणारे बायपास आहेत. पदाधिकाऱ्यांच्या एसएमएस, फोनला आयुक्तांसह अभियंते आचारसंहितेचे नाव पुढे करून उत्तर देत नाहीत, अशा तक्रारी शिष्टमंडळाने केल्या.
आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळ गेल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे मनपा आयुक्त डॉ. विनायक व इतर अधिकाऱ्यांमध्ये दोन ते अडीच तास औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावरून खल झाला. यात पालिकेने १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत रोज किती पाणी जायकवाडीतून शहरात आणले, त्याची माहिती दिली. त्याचा विचार केला तर शहरात रोज १२० ते १२५ एमएलडीदरम्यान पाणी आले आहे. यातील ५० एमएलडी पाणी सिडको परिसराला नियमित दिल्याची नोंद आहे. जर सिडकोला रोज ५० एमएलडीच्या आसपास पाणीपुरवठा होत आहे, तर मग पाणीपुरवठ्यावरून बोंब का होत आहे, असा प्रश्न आहे.
आयुक्तांकडे दुसऱ्यांदा बैठक
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे पाणीपुरवठ्यावरून सोमवारी झालेली दुसरी बैठक होती. आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाणीपुरवठ्यावरून बैठक झाली. वितरणात ब्रेकडाऊनमुळे अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे. जलकुंभ भरण्यासाठी १७ ते १८ तास लागतात, ब्रेकडाऊन झाल्यास पाणीपुरवठ्याला विलंब होतो. शिवाय टँकरचा भरणा होत असल्याची व पाणीपुरवठा शिफ्टची माहिती बैठकीत मनपा अधिकाऱ्यांनी दिली. शेंद्रा आणि वाळूज येथे टँकर भरणा करण्यासाठी सुचविले आहे. गळत्यांची दुरुस्ती व्हावी, तसेच पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच किमान दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल याचे नियोजन करण्यासाठी चर्चा झाली. बैठकीला मनपा आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, विभागीय आयुक्त केंद्रेकर व मनपा आयुक्त डॉ. विनायक यांनी दुपारनंतर एक्स्प्रेस जलवाहिनी, त्यावरील बायपास व गळत्यांची पाहणी केली.