औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणि संग्रहालयात इमू, सायाळ, स्पूनबील पक्षी आणि कोल्हा हे अनेक दिवसांपासून एकाकी जीवन जगत आहेत. त्यांना साथीदार मिळविण्यासाठी महापालिकेने देशातील विविध प्राणी संग्रहालयांकडे विचारणा केली होती. त्यानुसार अहमदाबाद येथील प्राणी संग्रहालयाने औरंगाबाद महापालिकेला हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे; तसेच या बदल्यात एखादा वाघ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यातील बहुसंख्य प्राणी हे एकापेक्षा जास्त संख्येने आहेत, परंतु सायाळ, स्पूनबील पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी एकेकच आहेत. साथीदार नसल्याने ते एकाकी जीवन जगत आहेत. त्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महापालिकेचे प्राणी संग्रहालय प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरातील प्राणी संग्रहालयांकडे या प्राण्यांना जोडीदार मिळविण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. आता अहमदाबाद येथील प्राणी संग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे हे प्राणी अधिक संख्येने आहेत. त्यामुळे त्यांनी हे प्राणी देण्यास तयार असल्याचे कळविले आहे, परंतु सोबतच त्याबदल्यात औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातील वाघाची जोडी किंवा एखादा वाघ मिळावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. आता सेंट्रल झू ॲथॉरिटीकडे प्राण्यांच्या हस्तांतराबाबत परवानगी मागण्यात येणार आहे. झू ॲथॉरिटीने परवानगी दिल्यानंतर हे प्राणी येथे आणले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राणी संग्रहालयात १४ वाघऔरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात सध्या १४ वाघ आहेत. आतापर्यंत येथील प्राणी संग्रहालयातून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे २६ वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदरासाठी औरंगाबाद प्राणी संग्रहालय चांगले ठिकाण ठरत आहे. आतापर्यंत येथे तीसहून अधिक वाघ जन्मले आहेत. त्यामुळेच देशभरातील प्राणी संग्रहालयाकडून अधूनमधून औरंगाबादकडे वाघांची मागणी होत असते.