औरंगाबाद : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणासाठी आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू असून रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसचे नियोजन केले; परंतु दक्षिण मध्य रेल्वेने जादा अथवा विशेष रेल्वे न सोडता प्रवाशांचा रेल्वे प्रवास अवघड करण्यास हातभार लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालये, विविध कंपन्यांना सुट्या लागल्या आहेत. यामुळे आपापल्या गावी परतण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात येत आहेत. यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, अकोला, जळगाव, धुळे, अमरावती इ. जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिक्षणानिमित्त तसेच अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळी सणाला सुरुवात होताच आपापल्या गावी जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून आगामी दोन दिवसांनंतर २३ आॅक्टोबरपासून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. दिवाळीनिमित्त अवघ्या काही वेळेत बस, रेल्वेगाड्या भरून जात असल्याचे दिसून येत आहे. परभणी, नांदेड, परळी, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते; परंतु नियमित रेल्वेतूनच प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांना काही गैरसोयींना सामोरे जावे लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
दीपोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग
By admin | Published: October 22, 2014 12:26 AM