लोणी खुर्द : वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील जि.प. शाळेच्या भिंतींना सुंदर माझी शाळा उपक्रमांतर्गत लोकसहभागातून रंगरंगोटी केली आहे. यामुळे या भिंती जणू बोलक्या झाल्याचे भासत आहे.
लोणी येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. दोन वर्षांपूर्वी सुनील गंगवाल यांनी मुख्याध्यापकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून शाळेचे अंतरंग, बाह्यरंग पूर्णपणे बदलून टाकले. पालकांशी संवाद साधून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले. यातच शाळेचे रूपडे पालटण्यासाठी त्यांनी मदतीची हाक दिली. याला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास ५० हजार रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर यातून शाळा रंगकाम व्यवस्थापन समितीतील ११ सदस्यांनी स्वखर्चाने रंगमंच उभारला, तसेच ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून शाळेला लॅपटॉप, टेबल, फॅन, खुर्च्या, बेंच इत्यादी साहित्य दिले. रंगकामासाठी परेश निकम यांनी परिश्रम घेतले. शाळेचा कायापालट करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सादिक सय्यद, सोनू साईनाथ जाधव, ग्रामसेवक साहेबराव जाधव, केंद्र प्रमुख सुनील गंगवाल यांच्यासह प्रभाकर जाधव, आजम सय्यद, बळीराम जाधव, राजेंद्र जगदाळे, तैमुर सय्यद, अप्पासाहेब जगदाळे, जालिंदर वाघ, रिखब पाटणी, मुक्तार शेख, पूजा अवचिते, सोनाली सोनवणे आदींनीही योगदान दिले.