औरंगाबाद : भागीदारीत सोन्याचा व्यवसाय करू, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नितेश घेवरचंद जैन (रा. सिडको एन-४), असे आरोपीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जयभवानीनगर येथील रहिवासी साईनाथ खंडू जानवळे यांचे मोबाईल शॉॅपीचे दुकान आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी हा त्यांच्याकडे नियमित येत असे. त्यातून त्यांची आरोपीसोबत ओळख झाली होती. आरोपी नितेश जैन हा सराफा दुकानदारांना सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्याचा व्यवसाय करायचा. त्यावेळी आरोपीने त्यांना मोबाईल शॉपीचा व्यवसाय करण्याऐवजी आपण भागीदारीत सोन्या-चांदीचा व्यवसाय करू, असे म्हणाला. त्यासाठी तुम्ही पंधरा लाख रुपये द्या आणि माझे पंधरा लाख रुपयांच्या भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू होईल, असे त्याने सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी आरोपीला दोन वर्षांपूर्वी पंधरा लाख रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतर त्याने लगेच व्यवसाय सुरू न केल्याने जोनवाळ यांनी वेळावेळी त्याची भेट घेतली तेव्हा त्याने काळजी करू नका, काहीतरी कारणे सांगून व्यवसाय सुरू करण्यास विलंब लागत असल्याचे म्हणायचा. मात्र, त्यानंतर तो पसार झाला. त्याने मोबाईल नंबरही बंद केला. परिणामी, तक्रारदारांचा त्यांच्याशी संपर्क तुटला. आरोपीने आपल्याप्रमाणे अनेकांकडून अशा प्रकारे मोठ्या रक्कम नेल्याचे तक्रारदारांना समजले. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी ठाण्यात आरोपीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करीत आहेत.