वाळूज महानगर : फॉल्टी बिलाच्या नावाखाली महावितरणकडून अवाच्या सव्वा वीज बिल देऊन आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार ग्राहकांतून केली जात आहे.
महावितरणच्या सिडको वाळूज महानगरातील उपकेंद्रांतर्गत १६ हजारांवर वीज ग्राहक आहेत. महावितरणकडून वीज मीटरची रीडिंग घेणे व वीज बिल वाटप करण्याचे काम एका खाजगी संस्थेला दिले आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मूळ रीडिंग न घेता अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांना बिलाचे वाटप केले जात आहे.
सरासरीपेक्षा अवाच्या सव्वा हजारो रुपये वाढीव बिले मिळत असल्याने ग्राहकांना दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. वरिष्ठ अधिकाºयाकडून अपवाद वगळता वाढीव बिल कमी न करता केवळ बिलाचे टप्पे पाडून, तसेच बिले ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दर महिन्याला महावितरणकडून सुरू असलेल्या या आर्थिक लुटीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मूळ रीडिंग न घेता अंदाजे रीडिंग टाकणाºया कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांतून केली जात आहे. महावितरणचे अभियंता उकंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.