औरंगाबाद : विडी ओढणाऱ्यास ‘तू गांजा ओढत असून, मी पोलीस आहे’, असे सांगून त्याची झडती घेत ३० हजारांचा ऐवज लुबाडल्याचा प्रकार एमजीएम हॉस्पिटलसमोर घडला. त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामराव नामदेव खैरे (४८, रा. करंजखेडा) यांच्या पत्नीवर एमजीएममध्ये उपचार सुरू आहेत. रामराव खैरे रिक्षा स्टँडच्या बाजूला विडी ओढत होते. ते एकटेच असताना भामट्याने त्यांना ‘मी पोलीस आहे. तू गांजा ओढत आहे. तुझी झडती घेऊ दे. किती गांजा लपून ठेवला आहे,’ असे म्हणत खैरे यांच्या खिशाची त्याने झडती घेतली. खिशातील डायरी व मोबाईल हँडसेट काढून घेतला. खिशातील कागदपत्रे व ४ गॅ्रम सोन्याच्या बाळ्या व रोख २३ हजार रुपयेही त्याने काढून घेतले. ‘जा तुझ्या खिशात काहीच नाही,’ असे सांगून हँडसेट व कादगपत्रांची डायरी पुन्हा खिशात कोंबून तो निघून गेला. नंतर खैरे घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आले. तेथे त्यांनी खिशातील २३ हजार आणि सोन्याच्या बाळ्या शोधल्या; पण त्या नव्हत्या. रामराव खैरे यांनी घडलेला प्रकार सिडको पोलीस ठाण्यास सांगितला व ३० हजारांचा ऐवज लुबाडला गेल्याची फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, तपास पोहेकॉ. महेमूद पठाण करीत आहेत.पोलिसांना अवश्य कळवापोलीस व सीआयडी असल्याचे सांगून महिला व वृद्धांना लुबाडणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, दंगल झाली आहे, दागिने चोरी होत आहेत, काढून ठेवा, पुडीत बांधा, असे सांगून लुटले जात आहे. बहुतेक सर्व ठाण्यांच्या हद्दीत असे अनेक प्रकार घडले आहेत. हे टाळण्यासाठी पोलीस सतत जागृत राहा, असा इशारा देत आहेत. कुणी पोलीस किंवा सीआयडी असल्याचे सांगून सोने, पैसे लुबाडत असेल किंवा काही संशयास्पद घटना घडत असल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे.
तोतया पोलिसाने ३० हजार लुटले
By admin | Published: July 09, 2014 12:37 AM