औरंगाबाद : खून झाल्याची बतावणी करून दोन तोतया पोलिसांनी ७२ वर्षीय महिलेच्या हातातील सुमारे एक लाखाच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने पळविल्या. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील मेहरसिंग नाईक शाळेजवळ घडली.
पोलिसांनी सांगितले की, शिवाजीनगर येथील कासलीवाल रानवारा येथील रहिवासी सुनंदा सूर्यकांत गरड या रविवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास सामान आणण्यासाठी किराणा दुकानात जात होत्या. मेहरसिंग नाईक शाळेच्या रस्त्याने त्या असताना मोटारसायकलवरून आलेले दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन थांबले.
आम्ही पोलीस आॅफिसर आहोत, पुढे एका ठिकाणी खून झाला आहे, तुम्ही पेपर वाचत नाहीत का, तुमच्या हातातील सोन्याच्या पाटल्या आणि बांगड्या पिशवीत काढून ठेवा, असे ते म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुनंदा यांनी त्यांच्या उजव्या हातातील ६० हजार रुपये किमतीची पाटली आणि ३० हजारांची बांगडी काढली आणि पिशवीत ठेवली. यानंतर त्या डाव्या हातातील पाटली आणि बांगडी काढत असताना एका भामट्याने सुनंदा यांच्या हातातील पिशवी घेत मी गाठ बांधतो, असे म्हणाला.
त्यांची नजर चुकवून आरोपींनी त्यांची पाटली आणि बांगडी काढून घेतली. नंतर गाठ बांधून पिशवी त्यांच्याकडे सोपविली आणि आरोपी तेथून दुचाकीने पसार झाले. सुनंदा यांनी पिशवीची गाठ सोडून पाहिली तेव्हा त्यांच्या पिशवीत बांगडी आणि पाटली नसल्याचे त्यांना दिसले. तोतया पोलिसांनी आपला विश्वासघात करून सुमारे लाखाची पाटली आणि बांगडी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तोतयांविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला.