औरंगाबाद : लिफ्ट मागणाऱ्यांना मदत करणे दुचाकीस्वाराला चांगलेच महागात पडले. लिफ्टची बतावणी करून मोपेडवर बसलेल्या दोन जणांनी दुचाकीचालकास धमकावून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, ९०० रुपये रोख, मोबाईल, आधारकार्ड, मतदार कार्ड आणि मोपेड हिसकावून नेली. ही घटना २० डिसेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास भावसिंगपुºयातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी छावणी ठाण्यात अनोळखींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
कर्णपुरा येथील रहिवासी सचिन लक्ष्मणराव देशमुख हे मजुरी करतात. २० डिसेंबर रोजी ते पंचवटी चौकात असताना त्यांना बालपणीचा मित्र भेटला. त्यांच्यासोबत गप्पा मारत असताना सोबतच्या दोन जणांना भावसिंगपुºयात नेऊन सोडण्याची विनंती मित्राने त्यांच्याकडे केली. मित्राच्या सांगण्यावरून सचिन हे दोन अनोळखींना मोपेडवर बसवून भावसिंगपुºयात जाऊ लागले. भावसिंगपुरा रस्त्यावरील संभाजी चौकाजवळ ते असताना मोपेडवर मागे बसलेल्या दोन जणांनी गाडी थांबायला लावली.
त्यानंतर त्यांनी अचानक सचिन यांच्या खिशातील पाकीट, मोबाईल हिसकावून घेतला. शिवाय मोपेड घेऊन ते तेथून पळून गेले. या घटनेप्रकरणी सचिन यांनी दुसºया दिवशी २१ रोजी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक मुळे तपास करीत आहेत. दरम्यान, पंचवटी चौकाजवळील उड्डाणपुलाखाली सचिन यांची मोपेड बेवारस अवस्थेत पोलिसांना सापडल्याचे उपनिरीक्षक मुळे यांनी सांगितले. आरोपींचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.