लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जबाजारीपणामुळे करोडपती ते रोडपती बनलेल्या एका व्यापाऱ्याने औरंगाबादेत गँग तयार करून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्यासह चार जणांना शुक्रवारी पहाटे अटक केली असून, त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक एअरगन जप्त केली.गँग लीडर व्यापारी कासम दादाभाई ठेकीया (५६, रा. बीड बायपास, दत्त मंदिर परिसर, मूळ रा. बुलडाणा), संजय त्रिंबक कापसे (४१, रा. गणेशनगर), दीपक आसाराम बरडे (३१, रा. गांधेली) आणि देवीदास विठ्ठलराव कदम (३३, रा. बालाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, कासम ठेकीया मूळचा बुलडाणा येथील रहिवासी आहे. एकेकाळी दोन चारचाकीचा मालक आणि कोट्यवधींची संपत्ती तो बाळगून होता. मात्र व्यवसायात घाटा आल्याने तो कर्जबाजारी झाला. काही दिवसांपासून तो कुटुंबासह औरंगाबादेत आला. बीड बायपास रोडवर आणि शहरात त्याने किराणा दुकान सुरू केले. डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी त्याने लुटमारीचा शॉर्टकट मार्ग निवडला. माणसे ठेवायचा कामालाएखाद्या व्यापाऱ्याला लुटायचे असेल तर त्या व्यापाऱ्याचा गल्ला किती जमा होतो, तो घरी केव्हा आणि कोणत्या मार्गाने जातो, त्याच्यासोबत कोण असते, याविषयीची सर्व माहिती मिळावी, यासाठी तो त्या दुकानात त्याच्या माणसाला नोकर म्हणून कामाला लावायचा. याच प्रकारे त्याने बीड बायपास परिसरातील एका दुकानात एका आरोपीला कामाला ठेवले होते. लुटमार करणाऱ्या या गँगची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना मिळाली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सावंत, साबळे, उपनिरीक्षक विजय जाधव, कल्याण चाबुकस्वार, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, कर्मचारी संतोष सोनवणे, सतीश हंबरडे, सुधाकर राठोड, धर्मा गायकवाड, नंदलाल चव्हाण, बबन इप्पर, विकास माताडे यांनी बीङ बायपासवरील वसाहतीतून आरोपींच्या रात्रीतून मुसक्या आवळल्या आणि दोन शस्त्रे जप्त केली.या टोळीत आरोपी कासमचा मुलगा सादीक ऊर्फ बाबा, अमोल घुगे यांचाही समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
कर्जबाजारी व्यापारी करायचा लुटमार
By admin | Published: June 24, 2017 12:26 AM