लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विष्णूनगरमध्ये राहणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या भाडेकरू ज्वेलसचे आणि एका निवृत्त कर्मचा-याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.प्राप्त माहिती अशी की, मागील दहा वर्षांपासून प्रकाश बाबूलाल कोचेटा हे पत्नी आणि मुलाबाळांसह पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या विष्णूननगर येथील गल्ली नंबर २ मधील घरात भाड्याने राहतात. त्यांचे टी.व्ही. सेंटर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. अधिक मासानिमित्त धोंड्याच्या कार्यक्रमासाठी प्रकाश यांची पत्नी मुलांसह चार दिवसांपूर्वी नाशिक येथील माहेरी गेली होती. त्यांना आणण्यासाठी प्रकाश हे शनिवारी सकाळी जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडीने नाशिक येथे गेले. ते रविवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादेत परतणार होते. कोचेटा यांच्या घराला बाहेरून कुलूप होते. ही बाब हेरून शनिवारी रात्री उशिरा चोरट्यांनी प्रकाश यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन वेगवेगळी कपाटे उचकटून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे अलंकार आणि २ लाख १४ हजार रुपये रोख, लहान मुलांचे दोन पिग्मी गल्ले होते.