छत्रपती संभाजीनगर : महाभारतात १०० अपराध करणाऱ्या शिशुपालचा वध सुदर्शन चक्र चालवून भगवान श्रीकृष्णाने केला होता. आता विरोधकांना पाडण्यासाठी सुदर्शन चक्राची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) ईव्हीएम मशिनचे बटण दाबा, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मतदारांना केले.
नंदवंशी अहिर गवळी यादव समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मंचावर महायुतीचे मध्य मधील उमेदवार प्रदीप जैस्वाल, भाजपचे मराठवाडा प्रभारी अरविंद मेनन, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर अशोक सायन्ना, कृशाल डोंगरे, किशोर तुलसीबागवाले, सूरज मेघावाले, मोहन मेघावाले, जगदीश सिद्ध, सुनील बागवाले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. यादव यांनी सांगितले की, श्रीकृष्णाने व गावकऱ्यांनी मिळून गोवर्धन पर्वत उचलला. एकी, एकजुटीचे बळ काय असते, हे श्रीकृष्णांनी दाखवून दिले. तेच विधानसभा निवडणुकीत मतदान करून समाजाने एकजुटीचे बळ सर्वांना दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मथुरेत श्रीकृष्णाचे मंदिर उभारायचे आहे.भगवान श्रीराम व भगवान श्रीकृष्णाचे नाव घेतल्यावर विरोधकांच्या पोटात दुखते, असा आरोप करीत मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, श्रीरामाचे मंदिर अयोध्येत उभारले. मात्र, मथुरेत श्रीकृष्णाचे मंदिर उभारायचे बाकी आहे. मध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात भगवान श्रीकृष्ण व श्रीरामाच्या जीवनावरील पाठ शिकविण्यात येणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.