औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत सुरू असलेल्या पावसाने नुकसान वाढले असून पहिल्या टप्प्यातील ४२ हजार ८९८ शेतांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले, तर ४३ हजार ४२० नुकसानीच्या सूचना रद्द करण्यात आल्या असून, २५ हजार ५३५ शेतांचे सर्वेक्षण बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. विमा कंपनीकडून ५८ हजार पिकांचे सर्व्हे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.
एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर शेतकऱ्यांची माहिती कंपनीकडे आली आहे. यात मका, कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेल्याने विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.
१५ दिवस उलटूनही पंचनामे अपूर्णच
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबरला पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे सांगितले होते. त्याला १५ दिवस उलटले तरी अद्याप प्राथमिक नुकसानीचे आकडे कृषीसह महसूल विभागांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होतील कधी आणि नुकसानभरपाई मिळेल कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
आणखी ७० हजार दाव्यांची शक्यता
जिल्ह्यात ६७ हजार दाव्यांपैकी ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. ४३ हजार सूचना रद्द होण्यात बहुतांश सूचना एकाच शेताच्या वारंवार आलेल्या असल्याने आकडा वाढलेला दिसतो. नुकत्याच झालेल्या नुकसानीच्या आणखी सुमारे ७० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे. पंचनाम्यांतून नुकसान ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार द्याव्यांची रक्कम कंपनी शेतकऱ्यांना अदा करेल.
- रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक