औरंगाबाद : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांनी नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) यांनी, ' महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव कायम भासत राहील.' अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोक संदेशात डॉ. कराड म्हणतात, “ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही देशाच्या इतिहास विश्वाची मोठी हानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधनेला त्यांनी आपले आयुष्य मानले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव कायम भासत राहील.
महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं देशाच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.