औरंगाबाद : गांधेलीतील रहिवासी डॉक्टर महिला पतीसोबत गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. परतताना पाठीमागून आलेल्या टॅंकरने दोघांना डाव्या बाजूने जोराची धडक दिली. यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
डॉ. लीलाबाई नामदेव भुजबळ- रंधे (४५, रा. गांधेली) असे मृत महिलेचे आणि नामदेव सूर्यभान भुजबळ (५०) असे जखमी पतीचे नाव आहे. हे दोघे नेहमीप्रमाणे पहाटे सोलापुर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. गांधेली ते देवळाईच्या मध्ये असलेल्या पुलापर्यंत जाऊन तेथून रोडच्या डाव्या बाजूने परत घराकडे येत होते. ६.१० मिनिटांनी साईश्रद्धा हॉटेलसमोरून जात असताना मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टॅकर चालकाने भरधाव वेगात चालवत आणून दोघांना धडक दिली. यात डॉ. लीलाबाई यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. नामदेव यांच्या दोन्ही हाताला, पायाला लागले. या परिस्थितीतही नामदेव यांनी तत्काळ दुचाकीवर घरी जाऊन चारचाकी गाडी आणून डॉ. लीलाबाई यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरु असतानाच त्यांची ९.३० वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
कोरोनाच्या काळात बनल्या देवदूतअनेक वर्षांपासून शहरातील धूत हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या डॉ. लीलाबाई या गावातील रुग्णांना सकाळ-संध्याकाळी तपासत होत्या. कोरोनाच्या काळात तर त्या गावासाठी देवदूत बनल्या होत्या. याविषयी गावकरी भरभरून बोलत होते.
गावकरी शोकाकुलसकाळीच डॉक्टरचा अपघात झाल्याची घटना गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा डॉ. लीलाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर गावकऱ्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरण शेताच्या मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावात चूल पेटली नाहीडॉ. लीलाबाई यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर गावात अनेकांनी चूल पेटवली नाही. डॉ. लीलाबाई यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या तिघांची आई गेली आहे. घरी येणारा प्रत्येक जण लेकरांकडे पाहून हंबरडा फोडत होता. त्यामुळे वातावरण शोकाकुल होते.