सोयगाव ( औरंगाबाद ) : संपूर्ण महाराष्ट्राला ग्रामीण नाट्यसृष्टीची वेगळी ओळख ज्या संस्थेने करून दिली आणि कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील कलावंतांच्या योगदानाचा आदर्श घालून दिला, ती संस्था म्हणजे 'श्रीराम संगीत मंडळी'...या संस्थेतील सगळ्यात ज्येष्ठ कलावंत सोयगांवचे आदर्श व्यक्तिमत्त्व सोपानमामा बोर्डे यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामधील 'शिवाजी' महाराजांच्या भूमिकेमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. या नाटकातील त्यांची शिवाजी राजांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या या भूमिकेची दखल घेऊन या नाटकाचे मुख्य लेखक वसंत कानेटकर यांनी या नाटकाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगांसाठी त्यांना घेण्याचे ठरवले. परंतु सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी काम करायचे ठरवले असल्याने हा प्रस्ताव त्यांनी नाकारला होता.
इ.स. १९४९ मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी सोपानमामा बोर्डे यांनी 'संत तुकाराम' या नाटकामध्ये 'सखी'ची भूमिका साकारून आपल्या नाट्यकलेला प्रारंभ केला. इ.स. १९४९ ते १९६६ म्हणजे जवळपास दोन दशकं नाटकांच्या रुपाने त्यांनी मराठी रंगभूमीची सेवा केली. 'श्री पुंडलिक' मध्ये 'पुंडलिक', 'नेकजात मराठा' मध्ये 'विश्वास', 'देव माणूस' मध्ये 'दादा', 'साष्टांग नमस्कार' मध्ये 'भद्रायू', 'तिसरा जावई' मध्ये 'विनायक', 'नवरा बायको' मध्ये 'विश्वास', 'डॉ.कैलास' मध्ये 'हरबा', 'वेगळं व्हायचय मला' मध्ये 'कर्नलकाका', 'पुण्यप्रभाव' मध्ये 'भूपाल' अशा अनेक नाटकांमध्ये मामांनी भूमिका केल्या.
नाटकांकडे केवळ व्यवसायचे साधन म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक, सामाजिक निधीसाठी त्यांनी विना मोबदला नाटकांचे प्रयोग केले. सन १९६२-६३ च्या काळात भारत-चीन युद्धाच्या वेळी नाटकांच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून संरक्षण निधी जमा करण्यात त्यांनी मदत केली.राज्यात श्रीराम संगीत मंडळी या नाट्य संस्थेचे नाव त्यांनी सोयगावचं रूपाने कोरले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.