तयारी : पूरग्रस्त भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जनजागृती मोहीम
राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोनाने कहर केल्यामुळे त्रस्त असलेल्या जिल्हावासीयांना सलग तिसऱ्या वर्षी मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे पुराची धास्ती निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ६७५.४६ मिलीमीटर आहे. मात्र, २०१९ साली सरासरीच्या ११६.७२ टक्के म्हणजेच ७८८.३९ मिमी पाऊस झाला. २०२० साली सरासरीच्या १४९.९५ टक्के म्हणजेच १ हजार ४५.१७ मिमी पावसाची नाेंद झाली. यावर्षीही हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविला असून, मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थान विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी ही मुख्य नदी आहे. या नदीला येणाऱ्या महापुरामुळे अनेक गावे पाण्याखाली जातात. हा पूर्वानुभव आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनही तयारी करीत आहे. याशिवाय जिल्ह्यात पूर्णा, शिवना, दुधना आणि औरंगाबाद शहरातील खाम या महत्त्वाच्या नद्या आहेत. गोदावरीशिवाय इतर नद्यांपासून अतिपाऊस झाल्यानंतरच पूर परिस्थिती निर्माण होत असते. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव हे पूरप्रवण तालुके आहेत. यातील पैठण आणि वैजापूर तालुक्यातील पैठण शहर, कावसान, दादेगाव जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव, डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदरूढोक, बाभूळगाव आणि बाजाठाण या गावांना पुरामुळे वेढा पडत असतो. या गावातील नागरिकांना पूरस्थिती निर्माण झाल्यास दुसरीकडे हलविण्यासाठी, मदतीसाठीच्या यंत्रणांची उभारणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. याशिवाय पशुधनासाठी छावण्या उभारण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.
प्रशासनाची तयारी काय?
फायर फायटर : ७५
बोटी : ८
लाईफ जॅकेट : १७७
लाईफ बॉय : ११२
रेस्क्यू व्हॅन : १
पॉईंटर्स
जिल्ह्यातील नद्या : ५
नदीशेजारील गावे : १६५
पूरबाधित होणारे तालुके : ९
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान : ६७५.४६ मिमी
बॉक्स
अग्निशमन दल सज्ज
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यास यशस्वीपणे तोंड देण्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाले आहे. आतापर्यंत अति पूरप्रवण तालुके असलेल्या पैठण, गंगापूर तालुक्यांतील विविध गावांमध्ये नागरिकांना पूरस्थिती निर्माण झाल्यास घ्याव्या लागणाऱ्या दक्षतेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. मंगळवारी गंगापूर तालुक्यातील विविध गावांना प्रशिक्षण देण्यात आले. बुधवार, गुरुवारी वैजापूर तालुक्यातील गावांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे चीफ फायर ऑफिसर आर. के. सुरे यांनी दिली. याशिवाय अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेली साधनांची दुरुस्ती, नव्याने खरेदीही करण्यात येत आहे. त्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावाही सुरू आहे. तसेच जिल्हा आपत्ती विभागाच्या सतत संपर्कात अग्निशमन दल असल्याचेही सुरे यांनी सांगितले.
बॉक्स
पूरबाधित क्षेत्राची काळजी
जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी करण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेतली आहे. यानुसार सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुका व प्रत्येक गावांचे आराखडे अद्ययावत करणे, तालुका आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेऊन मान्सूनपूर्व तयारीचे इतिवृत्त सादर करणे, तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत प्रत्येक गावात बैठक घ्यावी. आपत्ती काळात कोणत्या ठिकाणी छावण्या उभारता येतील, ट्रांजीट शेल्टर बांधणे व गुरांच्या छावण्या उभारणीबाबतचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी दिली.
बॉक्स
शहरातील धोकादायक इमारती
औरंगाबाद शहरातही धोकादायक इमारती, वृक्षांचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले आहे. यानुसार शहरात धोकादायक गटात मोडणाऱ्या इमारतींची संख्या ही ४१ एवढी असून, त्यात ३५० कुटुंबे बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतींविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. तसेच शहरातील धोकादायक वृक्षांना हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
कोट,
जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील तयारीसाठी मान्सूनपूर्व तयारीसाठी १४ मे रोजी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत तयारीचा आढावा घेतानाच उणीवा असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पूरप्रवण भागात तयारी करण्यात येत आहे.
- अजय चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, औरंगाबाद