औरंगाबाद : स्मार्टसिटी अंतर्गत छावणीमध्ये नेहरू पुतळ्यासमोर उभारण्यात आलेला ‘लव्ह औरंगाबाद’ हा ‘डिसप्ले’ सोमवारी उत्तररात्री एका माथेफिरुने दारुच्या नशेत तोडून टाकला. दरम्यान, छावणी ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तपासाची सूत्रे गतीमान करत ताेफखाना परिसरातील रहिवासी विष्णू काळे यास अटक केली.
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडावी म्हणून सर्वत्र अशाप्रकारचे ‘डिसप्ले’ उभारले आहेत. छावणी येथे पंडित नेहरु यांच्या पुतळ्यासमोर देखिल अशाप्रकारचा ‘डिसप्ले’ लावण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी उत्तररात्री दारुच्या नशेत विष्णू काळे या माथेफिरुने हा ‘डिसप्ले’ तोडून टाकला. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर शहरातील अन्य ठिकाणचेही ‘डिसप्ले’ फोडण्यात आल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे पोलिसांनी तातडिने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या अशा‘डिसप्ले’ची पाहणी केली व त्याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही शहरातील ‘डिसप्लें’ची पाहणी केली.
दारुच्या नशेत कृत्य, राजकारण नाही टीव्ही सेंटर चौकात ‘लव्ह संभाजीनगर’ असा ‘डिसप्ले’ लावण्यात आल्यामुळे काही जणांनी ‘औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर’ असा वाद उगाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वत: मनपा आयुक्तांनी या वादात कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केल्यानंतर ते प्रकरण तेथे मिटले. कालच्या या घटनेला देखिल काहीजणांनी त्या वादाची किनार असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. मात्र, स्वत: पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी यासंदर्भात सदरील तरुण हा दारुच्या नशेत होता. नशेतच त्याने रात्री हा ‘डिसप्ले’ तोडला. यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा केला आहे.