औरंगाबाद : चार दिवसांपासून प्रियकर भेटत नाही व फोनही घेत नाही. प्रियकराच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रेयसीने मग चक्क पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून, ‘मी आत्महत्या करण्यासाठी संग्रामनगर रेल्वेपटरीवर आलेय,’ असे कळविले. पोलिसांनी त्वरित धाव घेऊन या ३५ वर्षीय प्रेयसीला ताब्यात घेऊन समुपदेशन करून तिचे मनपरिवर्तन केले.
मोना (नाव बदलले, रा. राजनगर, मुकुंदवाडी) ही बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये धुणी-भांडी करते. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे. तिचे चार वर्षांपासून संतोषसोबत (नाव बदलले) प्रेमसंबंध आहे. संतोष विवाहित असून, तो ज्योतीनगर परिसरात राहतो. ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’ अशा आणा-भाका त्यांनी घेतल्या होत्या. संतोषचे तिच्या घरी सतत येणे-जाणे असायचे. दोघे फिरायलाही जात. दोघे भेटले नाही अथवा त्यांच्यात बोलणे झाले नाही, असा दिवस सहसा उजाडत नव्हता; मात्र गेल्या काही दिवसांपासून संतोष तिला टाळू लागला. तिच्या घरी जाणे-येणेही त्याने कमी केले. चार दिवसांपूर्वी तो तिच्या घरी गेला आणि त्यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचे म्हणाला आणि तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने हे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. चार-पाच दिवसांपासून तो तिला भेटला नाही. तिचे फोनही तो घेत नाही. संतोषच्या प्रेमात ती आकंठ बुडाली होती. रविवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास तिने संग्रामनगर रेल्वेपटरी गाठली आणि तेथून पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० नंबरवर फोन केला. प्रियकर भेटत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेची वाट पाहत थांबल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षाने लगेच जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या टू मोबाईल कर्मचार्यांना ही बाब कळवून ‘त्या’ महिलेचे प्राण वाचविण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय बोटके, पोलीस नाईक नारायण लोणे यांनी काही मिनिटांत तेथे धाव घेऊन मोनाला ताब्यात घेतले. विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील आणि पोलिसांनी तिची समजूत काढली. पोलिसांनी तिला जवाहरनगर ठाण्यात नेले. पोलिसांनी तिच्या प्रियकराला फोन लावला; मात्र फोन बंद होता. त्यास उद्या बोलावून घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले व त्यानंतरच तिला घरी नेऊन सोडले.