लातूर : मनाने एक झालेल्या प्रेमी युगुलास कुटुंबातील मंडळीकडून विरोध होत असल्याने या प्रेमी युगुलाने नवा संसार उभा करण्यासाठी मुंबई गाठली़ परंतू अहमदपूर पोलिस आणि भुतेकरवाडी येथील तंटामुक्त समितीने या प्रेमी युगुलाचे मन वळवून बुधवारी अहमदपूरला आणले़ त्याचबरोबर कुटुंबातील मंडळीशी संवाद साधून त्यांचा असलेला नकार होकारात बदलला आणि काही तासातच हे जोडपे पोलिस ठाण्यातच विवाहबद्ध झाले़ अहमदपूर तालुक्यातील भुतेकरवाडी येथील श्रीनिवास बोरके व रंजना पुट्टे या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते़ त्यांनी जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या़ दरम्यान, दोघांच्याही घरच्यांचा विरोध झाल्याने त्यांनी मुंबई गाठली़ दोघांचेही वय विवाहासाठी योग्य असल्याचे जाणून अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर व तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या जोडप्याशी संवाद साधला़ तुमचा निर्विघ्न विवाह पार पाडू, असे ठोस आश्वासन देऊन त्यांना गावाकडे आणले़ बुधवारी या जोडप्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्यातील असलेले समज-गैरसमज दूर केले आणि अवघ्या तासाभरातच त्यांचा विवाह आनंदाने लाऊन दिला़ (प्रतिनिधी)
प्रेमी युगुलावर अक्षता पडल्या पोलिस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2015 12:07 AM