पैठण : एकीकडे व्हॅलेंटाइनचे वारे वाहत असतानाच पैठण शहरात प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. कृष्णा पुंजाराम खुटेकर (२४, रा. नारळा, पैठण), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीवर गुन्हा नोंदवत तिला ताब्यात घेतले आहे.
कृष्णाला त्याची प्रेयसी सातत्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या धमक्या देत मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून कृष्णा याने बुधवारी राहत्या घरात सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने त्याने केबल वायरच्या साहाय्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. या घटनेचा पंचनामा करताना मयत कृष्णाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. यात मयत कृष्णाने प्रेयसीचे नाव टाकून ती मला खूप त्रास देत असून, धमक्या देत आहे. मी खूप मानसिक तणावात जगत असल्याने हे पाऊल उचलत आहे. यात माझी काहीच चूक नाही. मला न्याय द्यावा, असे लिहून इंग्रजीत सही केलेली आहे.
मयत कृष्णाच्या आईने संबंधित प्रेयसी माझ्या मुलास नेहमी पैसे मागत होती. यासह त्यास सातत्याने त्रास देण्याचा प्रकार तिच्याकडून होत असल्याचे सांगितले. याप्रकरणी मयत कृष्णाचे काका शिवाजी भाऊराव इंगळे (४५, रा. नारळा, पैठण) यांनी कृष्णाच्या प्रेयसीविरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख बामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे करत आहेत.
--- एकाच भागातील रहिवासी ----
मयत कृष्णा खुटेकर पैठण शहरातील नारळा भागात राहत होता. याच भागातील मुलीसोबत त्याचे सूत जुळले होेते. मात्र, त्याला प्रेयसीकडून त्रास होत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून हैराण होता. प्रेयसी मानसिक त्रास देत त्याची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे पुढे येत आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. कृष्णा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. त्याच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. घरात तो आणि आई, असे दोघेच राहत होते.