औरंगाबाद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी किमान तापमानात घसरण झाली आणि यंदाच्या हिवाळ्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत ९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. निच्चांकी तापमानाने शहर गारठले असून, नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.
शहरात सोमवारी ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवनावर परिणाम होत आहे. सकाळी आणि सायंकाळानंतर घराबाहेर पडण्याचे नागरिकांकडून टाळले जात आहे. दिवसाही गारवा जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर नागरिक ऊबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहेत. शहरात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी किमान तापमानात घट झाली. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार थंडी दिवसेंदिवस वाढत जाईल. डिसेंबरअखेर तापमानाचा पारा ७ ते ६ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
वाढत्या थंडीमुळे आतापर्यंत ऊबदार कपड्यांची खरेदी केलेली नसलेले नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत आहे. शिवाय हिवाळ्यातील पौष्टीक लाडू बनविण्याचीही लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांच्या विक्रीची दुकानेही शहरातील विविध बागात सजली आहे. याठिकाणीही नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पहायला मिळत आहे.
३ वर्षांपूर्वीच्या तापमानाची बरोबरी
शहरात ३० डिसेंबर २०१७ रोजी ९.२ अंश सेल्सिअस इतक्याच किमान तापमानाची नोंद झाली होती. ३ वर्षांनंतर मंगळवारी ऐवढेच तापमान नोंदले गेले.