औरंगाबाद : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ‘न्याय’ गोरगरिबांना देण्यासाठी न्यायाधीश झालो. घटनेवर निष्ठा ठेवून, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाच्या चौकटीत राहून न्यायदानाचे पवित्र कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यात कितीअंशी यशस्वी झालो हे माहीत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांच्या भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.‘ध्येयासाठी समर्पण करून चिकाटीने कष्ट केल्यास आणि पैशाला दुय्यम महत्त्व दिल्यास हमखास यश मिळेल’, असा यशस्वीतेचा मोलाचा मंत्र न्या. गवई यांनी तरुण वकिलांना दिला.न्या. गवई यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे हॉटेल प्रेसिडेन्ट लॉन्स गरवारे स्टेडियमसमोर चिकलठाणा औद्योगिक वसाहत येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी न्या. गवई सत्काराला उत्तर देताना बोलत होते.त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचे वडील रा.सु. गवई यांनी त्यांना सल्ला दिला होता की, ‘खोऱ्याने पैसा कमवायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय कर आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल, तर न्यायाधीश हो’. त्यापैकी गोरगरिबांना न्याय देण्यासाठीचा सल्ला शिरसावंद्य मानून न्यायाधीश झालो. ‘मार्गदर्शक तत्त्वे’ आणि ‘मूलभूत अधिकार’हा राज्य घटनेचा आत्मा आहे. त्या दोन्ही तत्त्वांना समान महत्त्व देऊन न्यायदान करणे घटनेला अभिप्रेत आहे. तसा मी कसोशीने प्रयत्न केला, असे न्या. गवई म्हणाले.यावेळी खंडपीठातील न्या. संजय गंगापूरवाला, न्या. सुनील देशमुख, न्या. रवींद्र घुगे, न्या. व्ही. एल. आचलिया, न्या. व्ही.के. जाधव, न्या. पी.आर. बोरा, न्या. के.के. सोनवणे, न्या. एस.के. कोतवाल, न्या. मंगेश पाटील, न्या. ए.एम. ढवळे, न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी, न्या. एस.एम. गव्हाणे, न्या. आर.जी. अवचट, निवृत्त न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास आणि न्या.एस.बी. देशमुख, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, प्रधान जिल्हा न्यायाधीश मेहरे, प्र. एच.एम. देसरडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणून विचार मांडताना औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती प्रसन्न वराळे म्हणाले की, न्या. गवई यांच्यावर आई-वडिलांनी केलेले संस्कार समर्थ आणि समृद्ध वारसा घेऊन न्या. गवई न्यायदानाच्या क्षेत्रात आले असले तरी कर्तृत्वाने त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. ते ‘सव्यासाची’ न्यायमूर्ती असल्याचे न्या.वराळे म्हणाले. व्यासपीठावर न्या. प्रसन्न वराळे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अतुल कराड, उपाध्यक्ष अॅड. राम शिंदे आणि सचिव अॅड. कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते. अॅड. कराड यांनी न्या. गवई यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण मंडलिक आणि ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, अॅड. वसंतराव साळुंके, अॅड. एन.के. काकडे, अॅड. रामेश्वर तोतला, अॅडिशनल सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. अॅड. नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. राम शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला वकील वर्ग, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.औरंगाबाद खंडपीठातील कार्यकाळन्या. गवई यांनी औरंगाबाद खंडपीठात साडेपाच वर्षे न्यायदानाचे काम केले. त्या काळातील अनेक आठवणींना या प्रसंगी विविध वक्त्यांनी उजाळा दिला. तेच सूत्र धरून न्या. गवई यांनी आपल्या जडणघडणीमध्ये वडिलांच्या शिकवणुकीचा, प्रेरणेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. श्रमाचे, कष्टाचे महात्म्य आपल्याला आईकडून प्राप्त झाले आणि त्याच पायाभरणीतून आजपर्यंतचा सारा प्रवास सुकर झाला. औरंगाबाद खंडपीठात काम करतानाचा काळ हा आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता, असे नमूद करीत न्या. गवई यांनी सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त केले.तरुण वकिलांना सल्लाकायदा ही निरंतर शिकण्याची बाब असून, आपल्याला सर्व काही आले असे ज्याला वाटेल त्याच दिवशी त्याचे करिअर संपेल, असे सांगून त्यांनी तरुण वकिलांना सातत्याने अभ्यास करण्याचा, मोठमोठी प्रकरणे न्यायालयात उपस्थित राहून ऐकण्याचा सल्ला दिला.
घटनेवर निष्ठा ठेवून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या चौकटीत न्यायदानाचे पवित्र कार्य करण्याचा प्रयत्न केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:05 PM
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला ‘न्याय’ गोरगरिबांना देण्यासाठी न्यायाधीश झालो. घटनेवर निष्ठा ठेवून, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाच्या चौकटीत राहून न्यायदानाचे पवित्र कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यात कितीअंशी यशस्वी झालो हे माहीत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांच्या भावना सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे सत्काराला उत्तर