औरंगाबाद : कोणत्या दिशेला जायचे आहे, हे चालकाला माहीत नसल्यामुळे खंडपीठाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला ट्रक उभा केल्यानंतर चालक आणि क्लिनर दोघेही खाली उतरले. तेवढ्यात ट्रकचे चाक जमिनीत रुतले अन् बघता बघता ट्रक खंडपीठाच्या भिंतीला तोडून पार्किंगमध्ये कोसळला. ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. सुदैवाने या घटनेतून चालक आणि क्लिनर बालंबाल बचावले.
जालना रोडवर चौदाचाकी दोन ट्रक सिमेंट घेऊन आले होते. उच्च न्यायालयाजवळ एन-४ च्या रस्त्यावर ट्रकच्या (एमएच ३४ बीजी १२८६) चालकाला कोणत्या दिशेने जायचे, याची निश्चित माहिती नव्हती. त्यामुळे या दोन्ही ट्रक एकामागे एक रस्त्याच्या कडेला न्यायालयाच्या संरक्षक भिंतीजवळ उभे करून चालक व क्लिनर पत्ता विचारण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी काही कळण्याच्या आत संरक्षक भिंतीलगत उभ्या असलेल्या ट्रकचे टायर जमिनीत रूतले आणि ट्रक भिंतीवरून न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उलटला. यामुळे ट्रकमधील सिमेंटच्या गोण्या न्यायालयाच्या आवारात विखुरल्या गेल्या. ट्रकचालकाने संबंधित मालकाशी संपर्क करून ट्रकमधील सिमेंट काढून घेतले व ट्रक बाजूला केला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी कोणीही आले नसल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.