लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटी पद्धतीवर मजूर नियुक्त करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना चक्क लकी ड्रॉ काढून कामाचे वाटप केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या आॅनलाईन निविदा प्रक्रियेला बगल देण्याचा हा प्रकार कृषी विद्यापीठात अनेक महिन्यांपासून सुरु आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध विभागांमध्ये कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ही कामे कंत्राटी पद्धतीवर देऊन ती मजुरांमार्फत करुन घेतली जातात. शासनाच्या नियमानुसार ३ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामाच्या आॅनलाईन निविदा काढणे बंधनकारक आहे. परंतु, कृषी विद्यापीठाने हा नियम बाजूला सारुन स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या नावाखाली चक्क लकी ड्रॉच्या माध्यमातून कंत्राटदारांना काम देण्यास काही महिन्यांपूर्वी सुरुवात केली. कृषी विद्यापीठाकडे असलेल्या कंत्राटदाराच्या यादीतील काही कंत्राटदारांकडे कामगार आयुक्त कार्यालयाचा परवाना नाही, शिवाय संबंधित कंत्राटदारांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा भत्ता शासनाकडे भरला जात नाही. तसेच संबंधित मजुरांचे दैनंदिन मस्टरही ठेवले जात नाही. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र गंभीर दखल घेतली जात नाही व सर्रासपणे संबंधित कंत्राटदारांना काम दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदारांकडून नियुक्त करण्यात आलेल्या मजुरांना शासन दरानुसार मजुरीही दिली जात नसल्याचे येथे काम करणाऱ्या मजुरांनी सांगितले.
लकी ड्रॉ काढून दिले जाते कंत्राटदारांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 12:14 AM