छत्रपती संभाजीनगर : ‘लम्पी’ हा त्वचारोग गायवर्गीय पशुधनाचा पिच्छा सोडायचे नाव घेईना. या आजाराला वेशीवरच रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सावध भूमिका घेत गोठा स्वच्छतेबाबत तसेच लसीकरणाची मोहीम हाती घेतली. तरीही या आजाराने चकवा दिलाच. गेल्या वर्षी ज्या तालुक्यांत हा आजार आटोक्यात होता, आता त्याच तालुक्यांत ‘लम्पी’ने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.
तथापि, हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सोमवारी शीघ्र कृती दलाची स्थापना केली. यामध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर संनियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कृती दलाने ‘लम्पी’बाबत आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास अथवा बाधित पशुधनाची माहिती मिळाल्याबरोबर तात्काळ लस आणि औषधांचा पुरवठा करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच पशुपालकांच्या अडचणींचे निवारण करावे लागणार आहे.
साधारणपणे एप्रिलपासून ‘लम्पी’ने जिल्ह्यातील पशुधनाला कवेत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये नव्याने गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या तालुक्यातील जनावरांंना या आजाराची मोठ्या संख्येने लागण झाली आहे. त्यानुसार बाधित गावांमधील जनावरांंना लसीकरण करण्याची मोहीम सुरू असून तातडीने औषधोपचार व गोठे स्वच्छाकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे.
जिल्ह्यात या वर्षी एप्रिल ते २० ऑगस्टपर्यंत ९७२ जनावरे बाधित झाली. उपचारानंतर यापैकी ६०१ जनावरे बरी झाली, तर ३२ जनावरे या आजाराने मरण पावली. गेल्या वर्षी या आजाराची लागन होऊन १ हजार ३१३ जनावरे दगावली होती. त्यामुळे प्रशासनाने यावेळी गांभीर्याने एप्रिलपासूनच लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधनापैकी ४ लाख ३७ हजार ३१६ जनावरांचे लसीकरण पूर्ण केले. सध्या जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत ३३९ जनावरे या आजाराने त्रस्त असून ६० जनावरांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्ह्यात लम्पीची तालुकानिहाय स्थितीऔरंगाबाद- ४३सिलोड- ०४सोयगाव- ०२पैठण- ४५गंगापूर- ५२फुलंब्री- १८कन्नड- १००खुलताबाद- १५वैजापूर- ६०
एप्रिलपासून आतापर्यंत लम्पीचा कहरबाधित जनावरे- ९७२बरी झालेली जनावरे- ६०१मरण पावलेली जनावरे- ३२सध्या आजारी जनावरे- ३३९गंभीर जनावरे- ६०