वाळूज महानगर : स्टील मटेरियल खरेदी केल्यानंतर कंपनीत भागीदारीचे आमिष दाखवून मुंबईच्या दाम्पत्याला ६ कोटी ७८ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसीतील ऑरबीट कंपनीच्या कार्यकारी संचालकासह इतरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवाराम चौधरी (रा. गिरगाव मुंबई) यांची मुंबई सोनालिका मेटल कॉर्पोरेश्न या नावाची स्टील उत्पादक कंपनी आहे. २०१७ मध्ये वाळूज एमआयडीसीतील आॅरबीट ईलेक्ट्रोमेट इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल रॉय यांनी चौधरी यांना स्टीलची ऑर्डर दिली होती. बड्या कंपनीची र्आॅडर मिळाल्यानंतर चौधरी यांनी ३५ लाख रुपयांचे स्टील मटरियल्स रॉय यांच्या कंपनीत पाठवून दिले होते. यानंतर जुले २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत चौधरी यांनी रॉय यांच्या कंपनीला ६० लाखाचे स्टील पाठविले. दरम्यान, मालाचे पैसे मिळत नसल्यामुळे चौधरी यांनी रॉय यांच्याकडे पैशाचा तगादा लावला. सतत पाठपुरावा केल्यानंतर रॉय याने चौधरी यांना तुम्हाला आॅरबीट कंपनीचे संचालक करतो, तुम्ही माझ्या कंपनीचे शेअर्स घ्या. आपण भागीदारात व्यवसाय करु, असे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून चौधरी यांनी स्वत: व पत्नी ऋतुदेवी या दोघांचे ३५ लाख रुपयांचे सव्वा लाख शेअर्स घेतले. काही दिवसांनी १ मार्च २०१९ ला एमसीएच्या ऑनलाईन साईटवर चौधरी यांना कंपनीच्या संचालक पदावर काढृन टाकल्याचे तसेच सव्वा लाखाचे शेअर्स दिसून आले नाही. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी वकीलामार्फत रॉय यांना कायदेशिर नोटीस बजावली होती.
यांनतर जुलै २०१९ मध्ये रॉय याने चौधरी यांच्याशी संपर्क साधून शपथपत्र तयार करुन चौधरी यांना पुन्हा आॅरबीट कंपनीचे संचालक करतो व तुमच्या मालाचे पैसेही परत करतो, असे सांगत करारनामा करुन घेत चौधरी व त्यांच्या पत्नीला पुन्हा संचालक केले. काही काळानंतर रॉय याने चौधरी यांच्याकडून पुन्हा ३२ लाखाचे स्टील घेतल्यानंतर ९ ऑगस्ट २०१९ ला चौधरी दाम्पत्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन त्यांना पुन्हा संचालक पदावरुन काढून टाकले.
६ कोटी ७८ लाखाची केली फसवणूकरॉय यांनी चौधरी व त्यांच्या पत्नीला कंपनीच्या संचालक पदावरुन काढुन टाकले. याचबरोबर चौधरी यांच्या नावावर असलेले ३५ लाखाचे शेअर्सही परस्पर हस्तांतरीत करुन घेतले. या शिवाय आॅरबीट कंपनीला वेळोवेळी पाठविलेल्या स्टेनलेस स्टील मटेरियल्यसचे ६ कोटी ४३ लाख रुपये दिले नाही. याप्रकरणात देवाराम चौधरी यांची एकुण ६ कोटी ७८ लाख रुपयाची फसवणुक झाल्याचे तक्रारती म्हटले आहे. याच बरोबर रॉय व कंपनीने औरंगाबाद येथील अमित ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीचीही अशाच प्रकारे फसवणुक केली आहे. या प्रकरणी अनिल रॉय, संचालक संगिता रॉय, व्यवस्थापक सुनील रॉय यांच्यासह इतराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हा अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.