वाळूजमहानगर : सोलापूर- धुळे महामार्गांवर असलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या आठ बंब व दहा ते बारा टँकरच्या साहाय्याने तासाभरात ही आग आटोक्यात आणली.
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रदीप जैस्वाल यांची सोलापूर- धुळे महामार्गावर तिसगावजवळ ग्रँड सरोवर हे सात मजली आलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ६४ खोल्या आहेत. गुरुवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागताच हॉटेलमधील ग्राहक व कर्मचारी तत्काळ बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, हॉटेल मालक आमदार प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांचा मोठा जमाव जमला. तो पांगवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब आणि जवळजवळ दहा ते बारा खासगी टँकर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धावून आले. त्यात वाळूज अग्निशमन दल, मनपा, बजाज आणि गरवारे या कंपन्यांच्या बंबांचा समावेश होता. आठ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास आटोक्यात आली. तोपर्यंत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब काकड, गणेश गिरी, बाळासाहेब आंधळे, पोलिस अंमलदार योगेश शेळके, विक्रम वाघ आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
अग्निशमन अवघ्या सात मिनिटात दाखलहॉटेलला लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूप धारण केले. हॉटेलच्या समोरील बाजूला आग लागली तेव्हा अवघ्या सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे अवघ्या तासाभरातच ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले.
प्लास्टीकच्या शेडमुळे आग पसरलीया हॉटेलच्या गॅलरीवर प्लास्टिकचे आकर्षक शेड तयार करण्यात आले आहे. शेडने पेट घेतल्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील आगीने तत्काळ रौद्ररूप धारण करत तिसऱ्या मजल्यास देखील कवेत घेतल्याची माहिती हॉटेलचे मालक आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली. पाहता पाहता हॉटेलच्या पूर्वेकडील बाजू आणि सोलापूर- धुळे महामार्गाकडील दक्षिण बाजू आगीच्या विळख्यात आली. मात्र, वेळीच सर्वजण बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. पहिल्या, दुसऱ्या मजल्याचे आधिक तर तिसऱ्या मजल्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचेही जैस्वाल यांनी सांगितले.